हिंदुस्थान झाला ‘निर्भय’युक्त, क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने देशातच विकसीत केलेले सबसोनिक-क्रुझ-मिसाईल ‘निर्भय’ची ओडिशाजवळील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने (DRDO) हे क्षेपणास्त्र विकसीत केले आहे. ‘निर्भय’ क्षेपणास्त्राची ही पाचवी चाचणी होती. याआधी केलेल्या चार चाचण्यापैकी तीन चाचण्या अयशस्वी झाल्या होत्या. ही चाचणी यशस्वी झाल्याने हिंदुस्थानी लष्कराची ताकद आणखी वाढली आहे.

डीआरडीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘निर्भय’ हे अत्याधुनिक असे सबसोनिक-क्रुझ-मिसाईल आहे. चांदीपूर येथील परिक्षण केंद्रावरून कॉम्प्लैक्स-३ या विशेष डिझाईन करण्यात आलेल्या लॉन्चरद्वारे सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

‘निर्भय’ क्षेपणास्त्राची खास वैशिष्ट्ये?

> निर्भय मिसाईल ३०० किलोग्राम परमाणू शस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे.

> मिसाईलची मारक क्षमता १ हजार किलोमीटर आहे.

> हे मिसाईल कोणत्याही वातावरणात व ऋतूमध्ये कार्य करण्यास सक्षम आहे.

birrbhay

> निर्भय मिसाईल रॉकेट बुस्टरद्वारे संचालित करण्यात येते. त्यामुळे हवेतल्या हवेत कलाबाजी करण्यात याचा हातखंडा आहे.

> या मिसाईलची आणखी एक खासियत म्हणजे हे कमी उंचीवरून उडण्यात सक्षम आहे. त्यामुळे रडारच्या नजरेत न येता लक्ष्याचा वेध घेता येतो.

> लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी यात उच्च प्रतिची दिशादर्शक प्रणाली वापरण्यात आली आहे.

निर्भय मिसाईलबाबत बोलताना शास्त्रज्ञांनी सांगितले की, ब्रम्होस मिसाईलची कमतरता भरून काढण्यास निर्भय सक्षम आहे. कारण ब्रम्होसची मारक क्षमता २९० किलोमीटर आहे, तर निर्भयची १ हजार किलोमीटर. मिसाईलची मारक क्षमता १ हजार किलोमीटर असल्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये याचा योग्य वापर करता येईल.