मोदी सरकारला धक्का, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोदी सरकारला धक्का बसला आहे. अध्यापनाची आवड असलेल्या पानगडिया यांनी अमेरिकेत  शिक्षण कार्यात सहभाग घेण्यासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाने अद्याप पानगढिया यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राजीनामा दिला असला तरी ३१ ऑगस्टपर्यंत पानगढिया उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
नियोजन आयोग कालबाह्य झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली होती. या आयोगावर २०१५ मध्ये पानगढिया यांची पहिले उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने  नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदावर आता कोणाची वर्णी लागेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मोदी सध्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आसाम दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतरच पानगढिया यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेतील असे बोलले जात आहे.
अरविंद पानगढिया अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अध्यापनासाठी जाण्यास इच्छुक आहेत. जगातील अनुभवी अर्थतज्ज्ञांपैकी एक असलेल्या पानगढिया यांचे नाव अर्थक्षेत्रात आदराने घेतले जाते.
कोलंबिया विद्यापीठातून कोणीच निवृत्त होत नाही. कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक त्यांच्या आरोग्याच्या क्षमतेनुसार आयुष्यभर विद्यापीठात अध्यापन करु शकतात त्यामुळेच पानगढिया यांना विद्यापीठाकडून दोनवेळा नोटीस पाठवण्यात आली होती. ‘तुम्ही विद्यापीठातील अध्यापन कार्य पुढे सुरु ठेवू इच्छिता का?,’ असा प्रश्न कोलंबिया विद्यापीठाकडून त्यांना विचारण्यात आला होता. ‘तुम्ही बऱ्याच कालावधीपासून विद्यापीठात अनुपस्थित आहात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो,’ असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले होते. यानंतर पानगढिया यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत कोलंबिया विद्यापीठातील अध्यापन कार्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.