गडकरींचे अभिनंदन!

नोटाबंदीमुळे श्रीमंतांचे अजिबात नुकसान झाले नाही. काळा पैसा पांढरा करण्याचाच तो एक डाव होता व त्यात काही मोजक्या धनाढ्य मंडळींची कशी चांदी झाली व त्यातून काही मंडळींच्या संपत्तीची कशी भरभराट झाली हे आता उघड झाले आहे. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत. आम्ही परखड गडकरींचे अभिनंदन करीत आहोत.

सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीचा त्रास झाल्याची कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरी हे मोदी सरकारातील ज्येष्ठ व कर्तव्यदक्ष मंत्री आहेत़ ते स्पष्ट व परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गडकरींचे बोलणे नेहमीच गांभीर्याने घेतले जाते, पण त्याच वेळी आणखी एक ज्येष्ठ मंत्री अरुण जेटली यांनी वेगळे मत मांडले आहे. नोटाबंदीचा अपेक्षित परिणाम झाल्याचे जेटली यांनी सांगितले आहे. दोन मंत्र्यांची दोन भिन्न मते आहेत. नोटाबंदीमुळे विकास दर घटला आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारीने कळस गाठला आहे हे सत्य असले तरी सरकारला ते मान्य नाही. हिंदुस्थानींच्या जगण्याच्या आकांक्षा वाढल्या आहेत असे अर्थमंत्र्यांचे मत आहे. गडकरी सांगतात ते खरे मानायचे की जेटली यांच्यावर भरवसा ठेवायचा ते भाजप प्रवक्त्यांनी सांगायचे. नोटाबंदीचा त्रास सर्वसामान्य जनतेलाच झाला हे आता जसे गडकरी बोलले तसे शरद पवारही बोलत आहेत, पण तेव्हा सगळेच नोटाबंदीच्या तालावर डोलत होते व टाळचिपळय़ा वाजवीत होते. नोटाबंदीस विरोध केला म्हणून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून रघुराम राजन यांना पायउतार व्हावे लागले. रघुराम राजन हे एक भुक्कड व बेअक्कल अर्थतज्ञ असल्याचे तेव्हा सांगण्यात आले, पण तेच रघुराम राजन अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत होते. नोटाबंदी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल असे ठाम मत त्यांनी मांडले होते. परिणामांची पर्वा त्यांनी केली नाही. २००८मध्ये आलेल्या जागतिक मंदीचे पहिल्यांदा भाकीत करणारेही आपले रघुराम राजनच होते; पण आपण त्यांना वाईट पद्धतीने घालवले व देशाच्या अर्थव्यवस्थेचे साफ नुकसान करून घेतले. नोटाबंदीमुळे श्रीमंतांचे अजिबात नुकसान झाले नाही. काळा पैसा पांढरा करण्याचाच तो एक डाव होता व त्यात काही मोजक्या धनाढ्य मंडळींची कशी चांदी झाली व त्यातून काही मंडळींच्या संपत्तीची कशी भरभराट झाली हे आता उघड झाले आहे. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत. आम्ही परखड गडकरींचे अभिनंदन करीत आहोत.

विजांचा प्रकोप

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे कुठला फेरा लागला आहे हे कळायला मार्ग नाही. मात्र सतत काही ना काही संकटे येतात आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याची जबर किंमत मोजावी लागते. आताही तेच झाले आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे कुठेही म्हणावी अशी पूर परिस्थिती उद्भवली नसली तरी कडाडून कोसळणाऱ्या विजांच्या प्रकोपाने रानावनात काबाडकष्ट करणारे शेतकरी, शेतमजूर मोठय़ा संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत राज्यभरात सुमारे ३५ जणांचे बळी कडाडणाऱ्या विजांनी घेतले आहेत. अचानक दाटून येणाऱ्या आभाळाने भरदिवसा अंधारून येते आणि कानठळय़ा बसवणाऱ्या ढगांच्या गडगडाटाने भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रचंड वेगाने एकमेकांवर आदळणाऱ्या ढगांतून विजेचे लोळ बाहेर पडतात आणि भयंकर कडकडाट करीत या विजा खुल्या जागांवर, शेतजमिनींवर आणि झाडांवर कोसळतात. पाऊस कोसळून वातावरण शांत होईपर्यंत अर्धा-एक तास विजांचे हे तांडव सुरू असते. आज या जिल्हय़ात, उद्या त्या जिल्हय़ात, तर परवा आणखी कुठे असा हा विजांचा प्रकोप सुरू आहे. एकटय़ा मराठवाडय़ातच विजांनी १० हून अधिक बळी घेतले आहेत. बीड जिल्हय़ात चारदरी गावात तर पावसामुळे एका झाडाच्या आडोशाला थांबलेल्या १० जणांवर वीज कोसळली. यापैकी ५ जण जागीच गतप्राण झाले, तर ५ जण गंभीर जखमी झाले. ठाणे-पालघर जिल्हय़ातही विजांनी ४ जणांचे बळी घेतले. बुलढाणा, अमरावती, जालना, धाराशिव जिल्हय़ांतूनही वीज बळींच्या बातम्या येत आहेत. एकीकडे विदर्भाच्या ६ जिल्हय़ांत शेतांमधील कीटकनाशकांच्या फवारणीतून आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे विजांचे तांडव शेतकऱ्यांचा घास घेत आहे. लोडशेडिंगमुळे वीज नाही म्हणूनही ग्रामीण जनतेचे हाल होत असतानाच आकाशातून कोसळणाऱ्या विजाही ग्रामीण जनतेच्या मुळावरच उठल्या आहेत. खुल्या आकाशात खऱ्या अर्थाने जिवाचे रान करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे आयुष्य सदैव खडतर आणि असुरक्षित आहे हेच खरे!