संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितिन पाटील यांची बिनविरोध निवड

86

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर त्यांचे चिरंजीव कन्नडचे माजी आमदार नितिन पाटील यांची आज गुरूवारी बिनविरोध एकमताने निवड झाली. बिनविरोध निवडीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे 25 फेब्रुवारी रोजी दुर्दैवी निधन झाले. या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागते, याची उत्सूक्ता सहकार क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. प्रारंभी सहकार विभागाने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू केली होती, मात्र या दरम्यानच लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आणि आचारसंहिता लागू झाली , त्यामुळे राज्य शासनाने सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुकांना स्थगिती दिली. आचारसंहिता संपुष्ठात आल्यानंतर आज गुरूवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पैठणचे माजी आमदार संदीपान भुमरे, ज्येष्ठ संचालक प्रभाकर पालोदकर आदींचे नावे चर्चेत आली होती, मध्यंतरीच बँकचे संचालक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना अध्यक्ष करण्यासाठी काही जणांनी चंग बांधला होता, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर बँकेचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सूकता ताणली गेली होती, प्रत्यक्षात आज अध्यक्ष निवडीच्यावेळी संचालक माजी आमदार नितिन पाटील यांचेच दोन अर्ज निर्धारित कालावधीत दाखल झाले. त्यांचे सूचक विद्यामान उपाध्यक्ष दामोधर नवपूते, किरण पाटील आणि अनुमोदक संचालक अभिजित देशमुख, रंगनाथ काळे हे होते. अन्य कोणाचाही अध्यक्षपदासाठी अर्ज न आल्यामुळे नितिन सुरेश पाटील यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी जाहीर केले. त्यांना कार्यालयीन अधीक्षक प्रशांत सदाफुले यांनी सहाय केले.

अध्यक्ष निवडीपुर्वी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्व संचालक मंडळाचे मते जाणून घेतले, बिनविरोध निवडीची परंपरा पुढे चालू ठेवण्यावर एकमत झाले. अध्यक्षांची निवड घोषित होताच नितिन पाटील यांचा प्रथम हरिभाऊ बागडे यांनी सत्कार केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आपले वडिल सुरेशदादा पाटील यांनी बँकेचा कारभार काटकसर करीत बँक नफ्यात आणली, त्यांचाच आदर्श समोर ठेवून बँकेची प्रगती साधन्याचा प्रयत्न केला जाईल,असे नितिन पाटील यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या कार्यालया सर्व संचालकांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी ज्येष्ठ संचालक रामकृष्णबाबा पाटील, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार, शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, संचालक बाबुराव पवार, प्रभाकर पालोदकर, रंगनाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, दशरथ गायकवाड, अंकुशराव रंथे, नंदकुमार गांधीले, अभिजित देशमुख, पुंडलिक काजे, जावेद पटेल, अशोक मगर, मंदाताई माने, माजी आमदार अण्णासाहेब माने, शांतीलाल छापरवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे, जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, पैठणचे माजी नगराध्यक्ष जितसिंह करकोटक, के. यु. गोडे, रामबाबा शेळके, जयराम साळुंके, सुदामदार ठोंबरे, पांडुरंग घुगे, कार्यकारी संचालक आर. आर. शिंदे, सरव्यवस्थापक अजय मोटे, सुनील पाटील, सुनील चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या