१८ कटप्पा करणार बिहारमध्ये घात ?

2

सामना ऑनलाईन, पाटणा

नितीश कुमार यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण गुरूवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. बिहारमधील राजकीय घडामोडीनंतर नितीश कुमार यांना संधीसाधू राजकारणी म्हटलं जाऊ लागलंय. याच नितीश कुमार यांना पाठींबा देण्यासाठी त्यांच्यासारखेच काही संधीसाधू आमदार तयार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे . त्यांच्या जोरावर नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करणं सोपं जाणार आहे. हे १८ कटप्पा त्यांच्या पक्षाच्या पाठीत तलवार खुपसत नितीश यांच्या समर्थनासाठी पूर्णपणे तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे सगळे आमदार काँग्रेसचे असून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे काही आमदार देखील नितीश कुमार यांना समरथन देण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी ही विशेष चिंतेची बाब आहे कारण त्यांचे बिहार विधानसभेत २७ आमदार असून त्यातले जर १८ आमदार नितीश कुमार यांच्या समर्थनासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. असं झालं तर बिहारमध्ये काँग्रेसचे फक्त ९ आमदार उरतील, ज्यांना फोडण्यासाठी नितीश कुमार आणि भाजपा येत्या काळात पुन्हा प्रयत्न करू शकतात.

  • बिहारमध्ये एकूण २४३ आमदार असून बहुमतासाठी १२२ चा आकडा गाठणं गरजेचं आहे
  • नितीश कुमार यांचे ७१ आमदार आहेत तर भाजपा आणि मित्रपक्षाचे ५८ आमदार आहेत
  • दोन्ही पक्षांचे मिळून १२९ आमदार होतात
  • हा आकडा प्रत्यक्षात आल्यास नितीश कुमार बहुमत सहजपणे सिद्ध करू शकतात
  • राष्ट्रीय जनता दलाचे ८० आमदार आहेत तर काँग्रेसचे २७ आमदार आहे
  • या दोघांचेही आमदार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
  • एकूण परिस्थिती पाहता नितीश कुमार यांचं पारडं जड दिसतंय
  • त्याचवेळेस राजद आणि काँग्रेसचं संख्याबळ घटण्याचीही शक्यता आहे