नितीशकुमार आणि भाजपचे ‘कमळ’छाप फटाके!

1

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बुधवारी संध्याकाळी ७ वाजता बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस यांच्या ‘महाआघाडी’च्या सरकारला मूठमाती दिली अन् आज सकाळी १० वाजता म्हणजे अवघ्या १५ तासांत नितीशकुमार यांनी जदयू-भाजप आघाडीचे सरकार स्थापन केले. जून २०१३ मध्ये त्यांनीच भाजप-एनडीएशी १७ वर्षांची युती मोडीत काढली होती. त्यामुळे नंतरच्या काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये नितीशकुमार हेच प्रामुख्याने भाजपच्या निशान्यावर राहिले. तर नितीशकुमार यांनीही ‘संघमुक्त हिंदुस्थान’चा नारा देत ‘महाआघाडी’ची उभारणी केली होती. त्यांच्याविरोधात भाजपने आजवर फोडलेल्या ‘कमळ’छाप फटाक्यांची झलक.

नितीशकुमार यांच्या डीएनएमध्येच गडबड
नितीशकुमार यांनी भाजप-एनडीएची साथ बिहारमध्ये सोडली तेव्हा मला खूप वाईट वाटले. पण नंतर त्यांनी ‘महादलित’ जितनराम मांझी यांच्या बाबतीतही तेच केले. मला वाटते त्यांच्या ‘डीएनए’मध्येच काही तरी गडबड आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान (२५ जुलै २०१५ मुझफ्फरपूर रॅली)

बिहारमध्ये भाजप हरला तर पाकिस्तानात फटाके फुटतील
भाजपचा बिहारमध्ये चुकून जरी पराभव झाला तर जय-पराजय इथला असेल. पण फटाके मात्र पाकिस्तानात फुटतील! भाजप जिंकला तर हिंदुस्थानात दिवाळी होईल. मात्र यूपीए जिंकली तर पाकिस्तानात जल्लोष होईल.
– अमित शहा, अध्यक्ष, भाजप (२५ डिसेंबर २०१५, रावसौल रॅली)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या ‘एनडीए’बाबत केलेली टिप्पणी तमाम बिहारवासीयांची मने, भावना दुखावणारी आहे. पंतप्रधानांचे वक्तव्य त्यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या सामूहिक विश्वासाला तडे देणारेच आहे.
– नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. – अश्विनीकुमार चौबे, भाजप खासदार (४ नोव्हेंबर २०१५)

नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांना बिहारचा पाकिस्तान करायचा आहे. – गिरीराज सिंग, केंद्रीय मंत्री,
(३१ ऑक्टोबर २०१५)