ब्रेक के बाद… नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री

45

सामना ऑनलाईन । पाटणा

राजीनामानाटय़ानंतर ब्रेक के बाद, अवघ्या 15 तासांत नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. सकाळी 10 वाजता अवघ्या 9 मिनिटांचा शपथविधी कार्यक्रम झाला. यावेळी भाजप नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्याच विधानसभेत शक्तिपरीक्षा होऊन बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या नाटय़मय आणि वेगवान राजकीय घडामोडींचे पडसाद पाटण्यापासून दिल्लीपर्यंत उमटत असून राजदबरोबर आघाडी तोडल्यामुळे जदयुचे ज्येष्ठ नेते शरद यादव नाराज आहेत. तसेच खासदार अली अन्वर यांनीही भाजपबरोबर आघाडीला विरोध केला आहे.

नितीशकुमार यांनी राजदबरोबर काडीमोड घेऊन बुधवारी सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मोठा राजकीय भूकंप केला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन तासांत भाजपच्या पाठिंब्यावर संसार करण्याचे जाहीर केले गेले. त्यानंतर बुधवारी रात्रभर अनेक नाटय़मय घडामोडी घडल्या. नितीशकुमार यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता होईल असे आधी रात्री 11 वाजता जाहीर करण्यात आले होते. परंतु सकाळी 10 वाजता होईल असे राजभवनाच्या सूत्रांनी मध्यरात्री सांगितले. त्यानुसार आज सकाळी 10 वाजता राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अवघ्या नऊ मिनिटांत हा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि भाजप नेते अनिल जैन यांच्यासह बिहारातील जदयु, भाजपचे आमदार होते. मात्र, जदयुचे ज्येष्ठ नेते शरद यादव हे अनुपस्थित होते.

मध्यरात्रीचे नाटय़

मध्यरात्री 2.30 च्या सुमारास तेजस्वी यादव आणि राजद नेत्यांनी मोठय़ा संख्येने राजभवनावर धडक दिली. सर्वाधिक आमदारांची संख्या राजदची आहे. त्यामुळे आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवावे अशी मागणी राजद नेत्यांनी केली. बोम्मई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला देऊन विधानसभेत सर्वाधिक आमदार असणाऱया पक्षाला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आधी आमंत्रित करावे असे राजद नेत्यांचे म्हणणे होते. मात्र ही मागणी राज्यपालांनी फेटाळली. भाजपने जदयुला पाठिंबा दिल्याचे आमदारांचे पत्र रात्री 11 वाजताच दिले आहे असे सांगण्यात आले. यावर न्यायालयात जाण्याचा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला आहे.

शरद यादव, वीरेंद्रकुमार, अली अन्वर नाराज
राजदबरोबरची महाआघाडी तोडून भाजपबरोबर जाण्याच्या नितीशकुमारांच्या निर्णयाचे पडसाद जदयुमध्ये उमटत आहेत. ज्येष्ठ नेते शरद यादव हे नितीशकुमारांवर नाराज आहेत. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच जदयुचे काही आमदारही नाराज असून ते शरद यादव यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शरद यादवांची भेट घेतली. दरम्यान, केरळमधील जदयुचे खासदार वीरेंद्रकुमार यांनी भाजपबरोबर आघाडी करण्यास विरोध केला आहे. राज्यसभा खासदार अली अन्वर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. नितीशकुमार यांच्या आंतरात्म्याने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर माझ्या आंतरात्म्याने याला विरोध केला आहे, असे अन्वर म्हणाले.

भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्री

अवघ्या 9 मिनिटांचा शपथविधी

बिहारात वेगाने राजकीय बदल

आज बहुमत सिद्ध करावे लागणार

नितीशकुमार दगाबाज आहेत. त्यांनी धोका दिला आहे. ही प्लॅनिंग चार महिन्यांपूर्वीच सुरू होती.
– राहुल गांधी
(काँग्रेस उपाध्यक्ष)

ना ना करते प्यार तुम ही से कर बैठे, करना था इन्कार मगर इकरार तुम ही से कर बैठे.
– अखिलेश यादव
(सपा अध्यक्ष)

लालूंवर ईडी’कडून गुन्हा अडचणींत वाढ

बिहारमध्ये सत्तासमीकरण बदलताच राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रेल्वेच्या हॉटेल कंत्राटांमध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या