Enjoy खाणं

2

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ खऱया अर्थाने सर्व प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतात.

  • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?– खाणं माझ्यासाठी यज्ञकर्म असल्यासारखं आहे.
  • खायला काय आवडतं? – चटपटीतमध्ये शेवबटाटा पुरी, पाणीपुरी, दहीपुरी असे पाश्चात्त्य फास्ट फूडपेक्षा हिंदुस्थानी फास्ट फूड जास्त आवडतं. ब्राह्मणी पद्धतीचं गूळ-गोडा मसाला घातलेलं शाकाहारी जेवण आवडतंच. माझी आई सीकेपी असल्यामुळे त्यांचे माशांचे प्रकार, वालाचं बिरडं, मसुराची आमटी तर सासरी हुमण, कोलंबीचं लोणचं, हळदीच्या पानातले बांगडे, रवा फ्राईड फिश, सोलकढी, किसमूड सुक्या बांगडय़ाची, बेळगावच्या पद्धतीचे कढी-पत्रावडे असं सगळं आवडतं.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – संध्याकाळी साडेसात नंतर काहीही खात नाही. जड पदार्थ त्याआधी खाते. उशिरा झोपत असेन तर फक्त गरम दूध पिऊन झोपायचं.
  • डाएट करता का? – हो. आठवडय़ातून चार दिवस कार्ब्स खात नाही. उकडलेल्या, वाफवलेल्या भाज्या खाते, यामध्ये पनीरच्या ऐवजी चिकनचा वापर करते.
  • कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – मासे बाहेर जाऊन खायचे असल्यास गोव्याला स्टार-लाईटमध्ये खायला आवडतील. काकोरी हाऊस, जय जवानचे कबाब खायला आवडतात. चर्चगेटला पिझ्झा बाय द बे मध्ये सँडविचेस आणि वेगवेगळ्या सलाडचा बुफे लागतो. तिथे खूपच अप्रतिम सलाड, सँडविचेस मिळतात त्याच्या समोरच समुद्र आहे. मला समुद्राजवळ बसून खायला खूप आवडतात.
  • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – रात्रीचं जेवण टाळते. त्याऐवजी दूध, फक्त भाज्या किंवा एग व्हाईटचं ऑमलेट, चणे-शेंगदाणे, वेगवेगळया कडधान्यांचं थालीपीठ, मुगाच्या डाळीचं चिला, असं खातं.
  • दौऱयानिमित्त आवडलेला खास पदार्थ?- इंदौरला तराफामध्ये तळलेले, छान मसाला लावलेले गराडू, मक्याचा किस, अंगूर रबडी, मुग्याच्या डाळीची, पालकाची भजी हे पदार्थ सगळं डाएट बाजूला आवर्जून खातेच. मग> तळ्याकाठी आणि वाडा चिरेबंदीच्या नाटकाच्या सेटवर आम्ही सगळेच एकत्र डबा खातो.
  • स्ट्रिट फूड आवडतं का? – नाही. पाणीपुरी खाल्ली तर एल्कोचीच खाते जिथे बिसलेरीचं पाणी वापरलं जातं. वाटेल तिकडचं खाणं नाही खाऊ शकत.
  • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – एकूण एक. साधं पिठलं भाकरी, मेथीची भाजी किंवा ग्रील्ड चिकन, उकडलेल्या भाज्या, घरी केलेला ब्रेड असं सगळंच आवडतं.
  • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा? – सारस्वती मेन्tयू केला तर कोलंबीचं लोणचं, माशाचं हुमण, पास्ता, सलाड, मेक्सिकन, छोले, राजमा, बटर चिकन, मैत्रिणीकडून शिकलेले दाल-मखनी, मकई-रोटी असे पंजाबी पदार्थ आता चांगले बनवते.

झटपट चिकन

चिकन ड्रमस्टिक्सला तेल लावायचं. त्याला खापा पाडून आलं-लसणाची पेस्ट, तंदुरी चिकन मसाला, तंदुरी चिकनचा थोडासा रंग, लिंबू लावून एक ते दीड तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं. त्यानंतर फोडणीला टाकण्याआधी बटर चोळायचं. तेलावर  एक एक चिकन ड्रमस्टिक टाकायचं. मंद गॅसवर हळूहळू परतायच्या. वरून हळद-तिखट, मीठ, आलं-लसणाची पेस्ट, लिंबू, तंदुरी चिकन मसाला लावायचं. तेलात परतत राहायच्या. हाडापासून मांस वेगळं झालं की, त्या शिजतात. नंतर  वरून काळं मीठ आणि  भरपूर कोथिंबीर घालायची.