पाकिस्तानला आता दमडीही नाही! राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हल्लाबोल

सामना ऑनलाईन,वॉशिंग्टन

अमेरिकेने गेल्या १५ वर्षांत पाकिस्तानला तब्बल ३३ अब्ज डॉलर्सची मदत केली, पण त्याबदल्यात पाकिस्तानने खोटारडेपणा करीत धोकाच दिला आहे. यापुढे आता पाकला एका दमडीचीही मदत करणार नाही असा हल्लाबोल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकडय़ांना दणका दिला. ट्विट करून ट्रम्प यांनी यापुढे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने २००२ पासून पाकिस्तानला सातत्याने आर्थिक मदत केली. तब्बल ३३ अब्ज डॉलर्स पाकला दिले. आम्ही मूर्खासारखी मदत करीत राहिलो आणि पाकिस्तान मात्र दहशतवादाला पोसत राहिला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि अमेरिका शेजारच्या अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचा शोध घेत राहिली. मदतीच्या बदल्यात पाकिस्तानने अमेरिकेला केवळ धोका दिला. आमच्या नेत्यांना मूर्ख बनविले, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दणक्यानंतर पाकडे हादरले आहेत. आम्ही लवकरच भूमिका स्पष्ट करू. सत्य जगासमोर आणू, असे पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे.

२५,५०० कोटी डॉलर्सवर पाणी

अमेरिकेकडून काही दिवसांत पाकिस्तानला तब्बल २५,५०० कोटी डॉलर्सची मदत देण्यात येणार होती, मात्र ट्रम्प यांच्या इशाऱयानंतर पाकला ही मदत मिळणार नाही.