शिक्षणाच्या आयचा घो! विद्यार्थ्यांनो, आवडीचे कॉलेज विसरा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न यंदा भंगणार आहे. शालेय शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रियेतून कॉलेज बदलाची संधी असलेला ‘बेटरमेंट’चा ऑप्शन यंदा डिलीट केला आहे. २५ मेपासून अकरावीचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून दहावीचा ऑनलाइन निकाल लागल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने यंदा प्रवेशप्रक्रियेत अनेक बदल केले आहेत. यापूर्वी पहिल्या गुणवत्ता यादीत मिळालेले कॉलेज दुसऱया गुणवत्ता यादीत बेटरमेंटची संधी मिळाल्यावर विद्यार्थ्यांना बदलता येत होते, पण आता तसे होणार नाही. विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत आल्यास त्याला प्रवेश मिळालेल्या कॉलेजची फी भरून आपला प्रवेश कन्फर्म करावा लागणार आहे.

यापूर्वी बेटरमेंटची संधी असताना गुणवत्ता यादीत नाव आल्यावर ५० रुपये भरून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी तात्पुरता प्रवेश घेत होते. पण आता ५० रुपये भरून तात्पुरता प्रवेश घेणे बंद झाले आहे.

असे होतील प्रवेश

> गुणवत्ता यादीत नाव आल्यावर विद्यार्थ्याने त्या कॉलेजची पूर्ण फी भरून प्रवेश घ्यायचा आहे.

> विद्यार्थ्याने भरलेल्या कॉलेज पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेले कॉलेज पहिल्या पसंतीचे असेल तर प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

> पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल.

> प्रवेश मिळालेले कॉलेज दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे असेल तर त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा की नाही हे विद्यार्थ्यावर अवलंबून आहे.

> प्रवेश घेतला नाही. दुसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज पसंती क्रमांक विद्यार्थी बदल करू शकतात.

> यंदा फक्त दहा कॉलेजांचे पर्यायच आहेत