शिरंबे गावच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज नाही

सामना प्रतिनिधी, संगमेश्वर

निवडणूक होणाऱ्या ३६ ग्रामपंचायतींच्या २७२ जागांसाठी दाखल झालेल्या ३८६ उमेदवारी अर्जांपैकी आज छाननीत ६ अर्ज बाद झाल्याने आता ३८० अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर सरपंचपदांच्या ३६ जागांसाठी दाखल झालेले ८४ हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. शिरंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अर्जच आलेला नाही. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तर ३६ पैकी १४ सरपंच बिनविरोध झाले आहेत.

तालुक्यात डिसेंबर अखेरीस मुदत संपणाऱ्या ३६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ३६ ग्रामपंचायतींच्या एकूण २७२ जागांसाठी हे धुमशान सुरू असून २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत याकरिता दाखल झालेल्या ३८६ अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. यामध्ये केवळ ६ अर्ज बाद झाले असून त्यात कळंबुशी ३, तुळसणी १, कोंडगाव १, शिवने १ यांचा समावेश आहे. यामुळे आता ३८० अर्ज शिल्लक राहिले आहेत.
तालुक्यातील शिरंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. नवीन नियमानुसार सरपंच हा उपसरपंच यांची निवड करणार आहे. मात्र जिथे सरपंचच नाही तिथे उपसरपंच तरी कसा होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर प्रशासन कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.