पालकांनो सावधान! निम्म्या शाळांमध्ये सीसीटीव्हीच नाहीत!

सामना ऑनलाईन, मुंबई

हरयाणाच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षीय प्रद्युम्नच्या निर्घृण हत्येनंतर मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच पोलिसांनी शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, समुपदेशक आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र शाळांनी हे सुरक्षेचे नियमच धाब्यावर बसवले आहेत. मुंबई विभागात प्राथमिक, माध्यमिकच्या मिळून सुमारे चार हजार शाळा आहेत, मात्र यांपैकी ४० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी दादर पश्चिमेकडील एका शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना राज्य सरकारला केली होती, मात्र या घटनेला वर्ष उलटून गेले तरी अद्यापही बहुसंख्य शाळा सीसीटीव्हीशिवायच आहेत. भरमसाट फी घेणाऱया मुंबईतील ६० टक्के शाळांमध्येच सीसीटीव्ही बसविण्यात आले असून उर्वरित शाळांना सीसीटीव्हीवरील खर्चाअभावी कॅमेरे बसविणे शक्य नाही. मध्यंतरी शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्याची बाबही पुढे आली होती. पण ही सूचनादेखील कागदावरच राहिली आहे. शाळांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकही दिसत नाही.

शिक्षक-पालक संघटनेत पोलिसांचा समावेश

स्कूल बस असो वा विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळांना पोलिसांतर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतात. त्याचे पालन होते की नाही हेदेखील आम्ही पाहतो. अनेक शाळांमधील शिक्षक-पालक संघटनांमध्ये पोलिसांचाही समावेश असतो. वारंवार होणाऱया सभांना पोलीस शाळांमध्ये हजर राहतात आणि आढावा घेत असतात. नियमांचे पालन होत नसेल तर ते शाळांच्या निदर्शनास आणले  जाते. अनेक शाळा सीसीटीव्ही लावण्यास टाळाटाळ करतात. त्यांना प्र्तेयक पोलीस ठाण्यात असलेल्या ‘एटीसी’ पथकातील अधिकारी मार्गदर्शन करतात. सीसीटीव्हीचे महत्त्व आणि गरज शाळांना पटवून दिली जाते. याशिवाय शाळांचा हलगर्जीपणा अनेकदा पालकही निदर्शनास आणून देतात. विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महिला पोलीस ‘पोलीस दीदी’ संकल्पना राबवितात, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली.

शाळेचे प्रवेशद्वार, कॅण्टीन, बाथरूमचे मुख्य प्रवेशद्वार, लायब्ररी, बेसमेंट, गच्ची या ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे.

सीसीटीव्हीचे दोन प्रकार आहेत. बंदिस्त ठिकाणी डोंब कॅमेरा (अंदाजे किंमत १२०० पासून पुढे) तर मोकळय़ा ठिकाणी बुलेट कॅमेरा (अंदाजे किंमत १४०० पासून पुढे) बसवावा लागतो. मेगा पिक्सलनुसार कॅमेऱयाची किंमत वाढत जाते.

कॅमेरामध्ये जे काही चित्रीत होते ते रेकॉर्ड करण्यासाठी डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरची गरज लागते. ही मशीन कमीत कमी चार हजार रुपयांना मिळते. यात हार्ड डिस्क टाकावी लागते.   सीसीटीव्हीपासून रेकॉर्डरपर्यंत वायरिंग तसेच मजुरीसाठी अंदाजे दोन हजार रुपये खर्च येतो.

शाळेतील सर्व कर्मचाऱयांचे समुपदेशन

शाळेतील सर्व कर्मचाऱयांची मानसिकता कशी आहे हे तपासणे कठीण आहे. त्यामुळे मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्कूलबस वाहक-चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे-प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

स्वच्छतागृहात आयाबाई हव्यात

शाळांमधील सर्व कर्मचाऱयांची चारित्र्य पडताळणी करणे आता आवश्यक आहे असे वाटते. सीसीटीव्हींची तर गरज आहेच याशिवाय शाळेच्या आत बाहेरील व्यक्तींना प्रवेश न देणे. स्वच्छतागृहात आयाबाईंची नेमणूक करणे, शाळांमध्ये सुरक्षा समिती नेमणे याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही- अरुंधती चव्हाण, अध्यक्ष, पेरेंटस्-टीचर्स युनायटेड फोरम

सीसीटीव्हींसाठी लोकप्रतिनिधींनी निधी द्यावा!

बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. सीसीटीव्ही आणि त्यावरील देखभालीचा खर्च शाळांना परवडणारा नाही. अशा शाळांसाठी लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जातील-अनिल बोरनारे, अध्यक्ष,उत्तर मुंबई शिक्षक परिषद

विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उद्या बैठक

विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात १४ सप्टेंबरला उत्पल संघवी शाळेत इंटरनॅशनल स्कूल असोसिएशन मुंबईतील १०० खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेणार आहे.  सीसीटीव्ही गरजेचा आहेच, पण मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकांची शाळेतील प्रत्येक हालचालीवर नजर आवश्यक आहे-डॉ. कविता अग्रवाल, अध्यक्ष, इंटरनॅशनल स्कूल असोसिएशन

रायन इंटरनॅशनल ग्रुपमध्ये १०० पेक्षा जास्त शाळा आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील सेंट झेवियर्स स्कूल साखळीचाच तो भाग आहे. १९८३ मध्ये ऑगस्टीन फ्रान्सिस पिंटो यांनी बोरिवली पूर्व येथे पहिले सेंट झेवियर्स हायस्कूल सुरू केले. ते राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न झाले आणि नंतर देशभरात त्याच्या शाखा पसरल्या.    रायन इंटरनॅशनल समूहाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार रायन इंटरनॅशनल स्कूल ही देशातील खासगी शिक्षण संस्थांची साखळी आहे. १९७६ मध्ये तिची स्थापना झाली. रायन ग्रुपने १९७६ मध्ये मुंबईत पहिली शाळा सुरू केली. सध्या त्यांच्या देशभरातील १८ राज्यांमध्ये १८६ शाळा आहेत. त्यात १८ हजार शिक्षक आणि तीन लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. दरवर्षी रायन ग्रुपच्या शाळेतून सुमारे ३० हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतात.