बारामतीच्या विजयावर मावळचे ‘विरजण’, सुळे यांच्या विजयाचे सेलिब्रेशन नाही

62

सामना ऑनलाईन । बारामती

एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे दीड लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या असताना दुसरीकडे मावळमधील पार्थ पवार यांचा पराभव बारामतीकरांच्या जिव्हारी लागला. परिणामी खासदार सुळे यांच्या विजयाचे फारसे सेलिब्रेशन बारामतीत झाले नाही. बारामतीच्या विजयावर मावळचे विरजण पडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.

मावळमधून पार्थ पवार सुरुवातीपासूनच पिछाडीवर राहिल्याची बोचणी कार्यकर्त्यांच्या मनात होती. सुप्रिया सुळे यांच्या विजयापेक्षाही पार्थ पवार यांचा झालेला मोठा पराभव बारामतीकरांच्या जिव्हारी लागला. बारामतीतील 23 एप्रिलचे मतदान संपल्यावर अनेकांनी मावळमध्ये धाव घेतली होती. राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच पदाधिकारी मावळात तळ ठोकून होते. पार्थ तेथून निवडून येतील असे ते छातीठोकपणे सांगत होते. परंतु पार्थ पराभवाच्या छायेत दिसताच अनेकांनी आपले मोबाईल बंद करून टाकले. एकीकडे सुळे यांचा मोठा विजय झाला असतानाही पार्थ यांच्या पराभवाने बारामतीत यंदा विजयाचे सेलिब्रेशन झाले नाही.

गत निवडणुकीत देशात एनडीएला घवघवीत यश मिळताच बारामतीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. यंदा कुल यांच्यासाठी मोठी ताकद लावूनही त्याचे मतात रूपांतर न झाल्याने एनडीएने एकहाती सत्ता खेचली तरी बारामतीत महायुतीकडून फारसे सेलिब्रेशन झाले नाही.

पार्थ यांच्या रूपाने पहिला पराभव
1967 साली शरद पवार राजकारणात आल्यापासून पवार घराण्याने एकही पराभव पाहिलेला नाही. 1991 पासून अजित पवार एकदाही पराभवाला सामोरे गेलेले नाहीत. सुळे यांनीही बारामतीत विजयाची हॅट्ट्रिक केली. परंतु पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्याला पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बारामतीच्या विजयी सेलिब्रेशनवर मर्यादा आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या