फिक्सिंगच्या आरोपातून शमीला क्लीन चीट; दरवर्षी मिळणार ३ कोटी

सामना ऑनलाईन । मुंबई

पत्नीने केलेल्या अनेक आरोपांमुळे अडचणीत सापडलेला हिंदुस्थानचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने शमीला फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त करत करारात शामिल केलं आहे. शमीवर असलेल्या फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये शमी निर्दोष आढळला आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. शमीची पत्नी हसीन जहाने इंग्लंडला राहणाऱ्या मोहम्मद भाईचं नावं घेत शमीवर फिक्सिंगचे आरोप केले होते.

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि बीसीसीआय भ्रष्टाचार विरोधी विभागाचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणाचा अहवाल नीरजकुमार यांनी बीसीसीआयसमोर सादर केला. शमीला या अहवालात निर्दोष ठरवण्यात आले आहे. शमी निर्दोष आढळल्यानंतर बीसीसीआयनं त्याचा वार्षिक करारामध्ये समावेश करण्यात आला आहे. या करारानुसार शमीचा ग्रेड बीमध्ये समावेश करण्यात आला असून त्याला वर्षाला ३ कोटी रुपये मिळणार आहेत. ग्रेड- बीमध्ये शमी व्यतिरिक्त लोकेश राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा आणि दिनेश कार्तिकचा समावेश आहे.

बीसीसीआयचे करारबद्ध खेळाडू
ए + ग्रेड खेळाडू : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह
ए ग्रेड खेळाडू : आर. अश्विन, रविंद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एम एस धोनी, ऋद्धिमान साहा
बी ग्रेड खेळाडू : लोकेश राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक
सी ग्रेड खेळाडू : केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव