मुंढेविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घ्या! मुख्यमंत्र्यांचा आदेश

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शनिवारी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. हा प्रस्ताव आणण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत भाजपच्या नगरसेवकांना हा अविश्वास प्रस्ताव आणू नका असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात बोलणाऱ्या भाजप नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. करवाढीचा निर्णय घेतल्याने भाजपचे नगरसेवक त्यांच्यावर भडकले होते. या करवाढीमुळे घरपट्टी २ हजारांवरून ११ हजार होईल असा दावा केला जात होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं मुंढे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत असताना भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता आणण्यात आला. मुंढे यांच्याविरूद्ध तक्रारी असत्या तर त्या मुख्यमंत्र्यांकडे मांडता आल्या असत्या मात्र असं न करता अविश्वास प्रस्ताव आणल्याने मुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अविश्वास प्रस्ताव मागे घ्या असे आदेश भाजपच्या नगरसेवकांना दिले आहेत.