नाशिक शहर भाजपात सन्नाटा

सामना प्रतिनिधी , नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यानंतर नाशिक शहर भाजपात मोठा सन्नाटा पसरला आहे. करवाढीसह इतर समस्या आणि आयुक्तांचा कारभार याबाबत शहरातील जनता आणि विविध संघटना यांना सामोरे जायचे कसे, याची चिंता आता महापौर, नगरसेवक आणि आमदारांना आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची परवानगी न घेता अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाईचे संकट उभे राहिले आहे.

करयोग्य मूल्य दरात केलेली वाढ, महापौरांसह नगरसेवक, भाजपा आमदारांना दिलेला शह यावरून आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुंढेंच्या मदतीला धावून आले. अविश्वास प्रस्ताव मागे घेवून महासभा रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महापौर रंजना भानसी यांच्यावर ओढवली. यानंतर शुक्रवारपासून भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर भानसी यांनी कुठलीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘नंतर सांगू’, ‘अजून काही ठरले नाही’, अशीच उत्तरे त्यांच्याकडून पत्रकारांनाही मिळत आहे. शहरातील शेतकऱयांसह विविध 52 संघटनांनी मुंढेंवरील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणारे पत्र महापौरांना दिले होते. आता या संघटनाही जाब विचारत असून, त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या निर्णयापुढे बोलायचे कुणी आणि काय, असा प्रश्न भाजपेयींना पडला असल्याने त्यांनी गप्प राहणे पसंत केले आहे.

फेरबदलाची भीती

महापौर भानसी, शहराध्यक्ष आमदार सानप यांच्या सांगण्यावरून मी माझ्या लेटरहेडवर स्थायी समिती सदस्यांच्या मुंढेंवरील अविश्वासासाठी सह्या घेतल्या, असे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राने कळविले आहे. तर पाटील हेच अविश्वासासाठी आग्रही होते, त्यांनीच जास्त पुढाकार घेतला, अशी माहिती दुसऱया गटाने पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यामुळे शहर भाजपात व महापालिका पदाधिकाऱयांत फेरबदल होवून आपले पद धोक्यात येण्याची भीती संबंधितांना आहे.