पावसाचा ओव्हरटाईम, डबेवाल्यांची विश्रांती आणि मुंबईकरांचा उपास

सामना ऑनलाईन, मुंबई

धावत्या मुंबईसोबत कधीही विश्रांती न घेणाऱ्या डबेवाल्यांना पावसाने सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. मुसळधार पावसामुळे उत्कृष्ट सेवा आणि नियोजनामुळे लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या डब्बेवाल्यांची सेवा आज (बुधवार) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमध्ये राज्य सरकारने शाळा आणि कॉलेजला सुट्या जाहीर केल्या आहे. अनेकांनी पावसाचं मंगळवारचं रुप बघून ऑफीसला दांडी मारण्याचा निर्णय घेतला. जे ऑफीसला पोहोचले त्यांची लवकर सटकायची तयारी सुरू होती.मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवाही कोलमडली होती त्यातच डबेवाल्यांनी त्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक मुंबईकरांना आज डबा पोहोचला नाही.

पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे, असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.

दरम्यान, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज मागे घेतला आहे. नवीन अंदाजानुसार काही ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी कोसळतील असे सांगण्यात आले आहे. याआधी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र बुधवारी सकाळी अनेक भागात पावसाचा जोर ओसरत असल्याचे चित्र दिसून आले.