साबणासारख्या वापरल्या जाणाऱ्या रिंगीची मागणी घटली, दर कोसळले

ringi-tree

जे. डी. पराडकर । संगमेश्वर

रिंगीचे झाड जरी जंगली समजले जात असले तरी, त्याला येणाऱ्या फळांचा वापर पूर्वी कोकणात केसांसाठी वापरला जाणारा साबण अर्थात शांपू म्हणून केला जात असे. कोकणच्या ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक घरपरड्यात एक तरी रिंगीचे झाड लावले जायचे. घरातील प्रत्येक स्त्री केस धुण्यासाठी प्रसंगी कपडे धुण्यासाठी देखील रिंगीचा वापर करत असे. आजही ग्रामीण भागात रिंगीचा वापर केला जात असला तरी, तरुण पिढी मात्र बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शांपूचा वापर करू लागली आहे. वापर आणि मागणी घटल्याने पूर्वी दहा ते बारा रुपये किलो असणारा रिंगीचा दर आता ५० पैसे ते दोन रुपये किलो एवढा चिंता करण्याएवढा खाली आला आहे. त्यामुळे एकेकाळी खूप महत्व असलेल्या रिंगीकडे दुर्लक्ष होवू लागले आहे.

रिंगीच्या झाडाचे लाकूड टीकाऊ आणि मजबूत असते. ऑक्टोबर महिन्यात या झाडाला मोहर म्हणजेच तुरा येवू लागतो. साधरण नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष फळधारणा होते. रिंग्या तयार झाल्या की, त्या आपोआप पडू लागल्यानंतर घरातील मूलांना रिंग्या जमविण्याचे काम दिले जाते. हंगामाच्या अखेरीस रिंगी बाजारात विकण्याची वेळ आली की, पूर्ण झाड काठीने झोडपून सर्व रिंग्या काढल्या जातात. घरात आवश्यक असणाऱ्या रिंग्या ठेवून रिंग्यांची पोती भरुन बाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. रिंगीच्या विक्रीतून पूर्वी संसाराचे अर्थकारण साधले जायचे. रिंगीच्या फळाचा आकार काचेच्या गोल गोटी एवढा असतो. फळाच्या आतमध्ये बी असते. सुकल्यावर हे फळ वजनाला एकदम हलके होते.

रिंग्या पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर काही वेळाने त्याला उत्तम फेस येतो. कोणत्याही केमिकलचा वापर नसल्याने याचा फेस अत्यंत शुद्ध स्वरुपाचा समजला जातो. रिंगीच्या फेसामध्ये कपडे भिजवून ठेवले जातात. या साबणात धुतलेले कपडे अत्यंत स्वच्छ होतात. रिंगीच्या फेसात पूर्वी सोन्या चांदीचे दागिने देखील स्वच्छ केले जायचे. पूर्वी सोनार देखील दागिने स्वच्छ आणि चकचकीत करण्यासाठी रिंगीच्या साबणाचा सर्रास वापर करीत असत. आता विविध प्रकारच्या केमिकलचा दागिने स्वच्छ करण्यासाठी वापर केला जात असल्याने सोनारांनी देखील रिंगीचा वापर करणे बंद केले आहे. याबरोबरच पूर्वीच्या स्त्रीयांव्यतिरिक्य कोणीही रिंगीचा वापर करत नसल्याने बाजारात रिंगीला असलेली मागणी पूर्णता घटली असल्याने दरही पूर्णपणे गडगडले आहेत. परिणामी रिंगीच्या झाडाची नव्याने लागवड पूर्णपणे बंद झाली आहे.

शालीनी हळबे (वय 72) यांनी आपण आजही रिंग्या वापरत असल्याचे सांगून यामुळे आपले केस आजवर व्यवस्थित असल्याचे सांगितले. रिंग्या थोड्याशा खरडून घेतल्यानंतर त्याचा फेस अधिक येतो. रिंगीच्या साबणात कपडे धुतल्याने कपडे स्वच्छ तर होतात पण अधिक टीकाऊ होत असल्याचा आपला अनुभव असल्याचे नमूद केले. रिंगीच्या साबणाचा वापर केल्यास केसही गळत नाहीत आणि सळसळीतही होतात. गेली ५० पेक्षा अधिक वर्षे आपण रिंग्यांचा वापर करत असल्याने त्याचे महत्व आपल्याला चांगले पटले आहे. सध्याच्या काळात मात्र तरुण मुली, स्त्रीया रिंग्यांच्या ऐवजी तयार शांपू वापरत असल्याने रिंगीचे महत्व कमी होऊ लागले आहे.