रायगडमध्ये महामार्गावर २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान अवजड वाहतूक बंद

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता येत्या  २९ ते ३१ डिसेंबर (शुक्रवार ते रविवार)दरम्यान जिह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. या कालावधीत जिह्यातून जाणाऱया महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे दिले.

नुकत्याच दि. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत जिह्यात विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढल्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची तत्काळ बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, समुद्रकिनाऱयावर येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सागरी किनाऱयांवर सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत जीवरक्षकांची पथके तैनात करण्यात यावीत. तसेच पर्यटकांची ने आण करणाऱया बोटी व साहसी खेळांसाठी वापरण्यात येणाऱया स्पीड बोट यांवर प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात येऊ नयेत, यावर बंदर निरीक्षकांचे पथक गस्त घालून लक्ष ठेवेल. तसेच प्रवाशांना जीवरक्षक उपकरणे परिधान केल्याशिवाय साहसी खेळांकरिता प्रवेश देऊ नये, या सर्व बाबींचे कटाक्षाने पालन करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.