चीनमध्ये हिंदुस्थानी बौद्ध भिक्खूंना ‘नो एन्ट्री’

सामना ऑनलाईन। पेईचिंग

चीनमधील सिचुआन प्रांतात तिबेटीयन भिक्खूंना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. चुकीचे प्रशिक्षण मिळालेले हे भिख्खु चीनमध्येही फुटीरतावादाची बीज पेरतील असा आरोप करीत चीनने ही बंदी घातली आहे. असे वृत्त येथील मीडियाने प्रसिद्ध केले आहे.

सिचुआन प्रांतातील लिटयांग कौंटीमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. येथील स्थानिक वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने याबद्दल वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात हिंदुस्थानमध्ये बौद्ध भिक्खूंना चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे भिक्खू चीनमध्ये आले तर येथील भिक्खूंना देखील ते भडकावतील, फुटीरतावादाचे प्रशिक्षण देतील. यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

लिटयांग प्रांताचे सांस्कृतिक विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, दरवर्षी कौंटी तर्फे देशभक्तीवर आधारित अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार तिबेटीयन बुद्धीस्ट स्टडीज इन इंडियासाठी महत्वाचा मानला जातो. यामुळे या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणावर तिबेटीयन भिक्खू येतात.

दरम्यान, चीन दलाई लामा यांच्याकडे एक फुटीरतावादी नेता म्हणून बघतो. चीनविरोधी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्यानेच ते नेहमी स्वतंत्र तिबेटची मागणी करत असतात असा आरोप सातत्याने चीन करीत आला आहे. तर दलाई लामा यांनी कायम चीनच्या आरोपांच खंडन केले असून फक्त स्वतंत्र तिबेटची आपली मागणी असल्याचे म्हटले आहे. सध्या दलाई लामा हिंदुस्थानात राहात आहेत.