सातवा वेतन आयोग मिळाला, पण घरभाडे भत्ता कापला

23

सामना प्रतिनिधी, मुंबई

सातवा वेतन आयोग फेब्रुवारीच्या पगारात मिळणार आहे, मात्र या आयोगानुसार पगार देताना सरकारने घरभाडे भत्त्यात मात्र कपात केली आहे. घरभाडे भत्ता सहा ते दोन टक्क्यांनी कापण्यात आला आहे. शहरांत 24 टक्के घरभाडे भत्ता तर ग्रामीण भागात 8 टक्के भत्ता देण्यात येणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना 30 जानेवारीला काढण्यात आली. त्यापाठोपाठ घरभाडे भत्त्यांसदर्भात सुधारित आदेश वित्त विभागाने काढले. यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सहाव्या वेतन आयोगात शहरी भागात अ, ब आणि क आणि ग्रामीण (अ वर्गीकृत) अशी वर्गवारी करून सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जात होता. सातव्या वेतन आयोगात एक्स, वाय व झेड असे वर्गीकरण करून घरभाडे भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. आधीच्या आयोगाप्रमाणे 30, 20 व 10 टक्के भत्ता मिळत होता. त्याऐवजी आता 24, 16 व 8 टक्के असे घरभाडे भत्त्याचे दर ठरवण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
महागाई भत्त्यांचा दर ज्यावेळी 25 टक्क्यांच्यावर जाईल त्यावेळी घरभाडे भत्त्याच्या दरात वाढ करण्यात येणार आहे. घरभाडे भत्त्यात कपात करण्यात आल्याने आणि वाहतूक भत्ता जुन्याच दराने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.