शाळेत हजेरी वेळी ‘जय हिंद’ म्हणा! मध्य प्रदेशातील भाजपचा फतवा

सामना ऑनलाईन, भोपाळ

मध्य प्रदेशातील भाजप सरकारने शाळांमध्ये हजेरी लावताना मुलांना यस सर किंवा यस मॅडम म्हणण्याऐवजी ‘जय हिंद’ म्हणण्याचा फतवा काढला आहे. या मुलांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लावण्यासाठी सरकारने हा नियम काढला आहे. सतना शहरातील शाळांमध्ये १ ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हा नियम लागू करण्यात येणार आहे. तो यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विजय शाह यांनी दिली.

राज्यातील खासगी शाळांसाठी हा नियम बंधनकारक नाही. मात्र खासगी शाळाही याची अंमलबजावणी करतील, अशी आम्हाला आशा आहे, असे ते म्हणाले. हा नियम कोणतेही राजकारण, धर्म याच्याशी निगडित नसून राष्ट्रभावनेशी निगडित आहे, असे ते म्हणाले. हा निर्णय राष्ट्रभावनेशी निगडित असल्याचे सांगण्यात येत असले तरीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे पाहिले जात आहे.