इम्रान खानचा पचका, कराचीच्या समुद्रात ना तेल मिळाले ना गॅस

137

सामना प्रतिनिधी । कराची

कर्जबाजारी पाकिस्तानला इम्रान खान यांच्या रूपाने नवा पंतप्रधान मिळाला पण देशाला कर्जातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले सगळे प्रयत्न असफल झाले आहेत. अरबी समुद्राला लागून असलेल्या कराची बंदराजवळच गॅस आणि तेल साठे सापडले नाहीत. त्यामुळे हे खोदकाम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे खान यांचा पचका झाला आहे.

क्रिकेटची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यावर राजकीय कारकीर्दही यशस्वी करण्यासाठी इम्रान खान यांनी कंबर कसली असली तरी आर्थिक संकटातून त्यांचे पाकिस्तानला बाहेर काढण्याचे सर्व मार्ग अयशस्वी झाले आहे.

केकरा-1 पोकळ निघाले

कराचीजवळ केकरा-1 या तेलविहिरात खोदकाम सुरू होते. अमेरिकेची इक्सन मोबील, इटलीची ईएनआय आणि इतर मोठ्या तेल कंपन्यांकडून केकरा-1मध्ये खोदकाम सुरू होते. साडेपाच हजार मीटर खोदकाम करूनही या कंपन्यांच्या हाती काही लागले नाही. शेवटी तेथे खोदकाम थांबवण्यात आले आहे, असे तेल आणि पेट्रोलियममंत्री नदीम बाबर यांनी सांगितले. या खोदकामासाठी जवळजवळ 100 मिलीयन इतका खर्च आला आहे.

खान यांची फुशारकी

कराचीजवळ तेल आणि गॅसचे साठे सापडल्याचे इम्रान खान यांनी मार्चमध्ये म्हटले होते. हे साठे एवढे प्रचंड आहेत की, या पुढे तेल आयाताची पाकिस्तानला गरज पडणार नाही. पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि त्याची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही, अशी फुशारकी खान यांनी मारली होती. देशवासीयांना आम्ही एक चांगली बातमी लवकरच देऊ, असेही खान म्हणाले होते. मात्र, खोदकामानंतर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या