‘त्या’ विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात नो एण्ट्री

सामना प्रतिनिधी । मुंबई

कॉलेजस्तरावर होणाऱया अल्पसंख्याक, इनहाऊस कोटय़ातील जागा पटकावून नंतर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतही चांगले कॉलेज मिळविण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. कोटय़ातून अकरावीचा प्रवेश पक्का करणाऱया विद्यार्थ्यांना यंदा ऑनलाइन प्रवेशात कॉलेज बदलाची संधी मिळणार नसून त्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या चार फेऱयांमध्ये भाग घेता येणार नाही.

आतापर्यंत कोटय़ातून प्रवेश घेणारे विद्यार्थी ऑनलाइन प्रवेशातही अर्ज करीत होते. ऑनलाइनमध्ये चांगल्या कॉलेजची लॉटरी लागली तर हे विद्यार्थी कोटय़ातील प्रवेश रद्द करून ऑनलाइनमध्ये मिळालेल्या कॉलेजात प्रवेश घेत होते, अन्यथा कोटय़ातील आहे तोच प्रवेश कायम करीत होते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना असे करता येणार नाही. 30 जून दुपारी 1 वाजेपर्यंत अल्पसंख्याक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेश होणार असून या कोटय़ातून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशाची दारे बंद होणार आहेत. विद्यार्थ्यांना कोटय़ातील प्रवेशावरच समाधान मानावे लागणार आहे.

अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेश कॉलेजस्तरावर होणार असले तरी प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी होणार आहे.

कोटय़ातून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी सर्वसाधारण गुणवत्ता यादीपूर्वी झाल्यास अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशात सहभागी होता येणार नाही.

कोटय़ातील जागांचे गणित स्पष्ट होणार
यापूर्वी कोटा आणि ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी अर्ज करण्याची मुभा असल्याने एक विद्यार्थी अकरावीच्या दोन जागा अडवून ठेवत होता. त्यामुळे फक्त ऑनलाइन प्रवेशासाठीच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. याशिवाय ऑनलाइनमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्याने कोटय़ातील जागा रिक्त करूनही काही कॉलेज या जागा ऑनलाइनसाठी देत नव्हत्या. पण आता कॉलेज बदलाची संधी नसल्याने कोटय़ातील जागांचे गणित ऑनलाइन प्रवेश सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट होईल.

कोटय़ातील उपलब्ध जागा

इनहाऊस – 38 हजार 372
अल्पसंख्याक – 79 हजार 30
इनहाऊस – 14 हजार 606
(गेल्या वर्षीपेक्षा या जागांमध्ये यंदा 7 हजार 980 ने वाढ झाली आहे.)
इनहाऊस कोटय़ातून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. शाळेशी संबंधित ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश पक्का करायचा की ऑनलाइनमध्ये मोठय़ा कॉलेजात प्रवेश मिळण्याची वाट पाहायची अशा पेचात हे विद्यार्थी सापडले आहेत.