विजय कोणाचा होवो; विजयी मिरवणुका नाही

270

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

विजय कोणाचा होवो, 23 मे रोजी विजयी मिरवणुका काढता येणार नाही. काढली तर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

संपुर्ण देशभरात 17 व्या लोकसभा निवडणूकांची मतमोजणी 23 मे रोजी होत आहे. बुलढाणा मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड, बुलढाणा येथे सकाळी 8 वाजेपासुन सुरु होणार असून या मतमोजणीकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी केंद्रामधील कक्ष सुसज्ज करण्यात आले आहेत. निवडुन कुणीही येवो, परंतु उद्या, जिल्ह्यात कुठेही मिरवणुक काढण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनही प्रशासनाने भरभक्कम तयारी केली असुन केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल तथा जिल्हाभर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संभाव्य परिस्थीतीला नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी प्रथमच एसआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्यांची कुमक सुध्दा तयार ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय सहा विभाग करण्यात आले आहेत. या मतमोजणीच्या 25 फेर्‍या होणार आहेत. सर्वप्रथम पोस्टल व इटीबीपीएस इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर बॅलेट पेपर सिस्टीम यांच्या मतमोजणी होणार आहे. त्यानंतर इव्हिीएममधील मतदानाची मोजणी सुरु होईल. त्यानंतर मजमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल राहणार आहे. तसेच पोस्टल बॅलेट व इटीबीपीएसकरिता 10 टेबल असणार आहे. मतमोजणी केंद्रात विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या 24 फेर्‍या, चिखली मतदार संघाच्या 23 फेर्‍या, सिंदखेडराजा मतदार संघाच्या 25 फेर्‍या, मेहकर मतदार संघाच्या 25 फेर्‍या, खामगाव मतदार संघ 23 फेर्‍या, जळगाव जामोद मतदार संघ 23 फेर्‍या होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या