शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारली

rahul-gandhi

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची 23 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर सभेला परवानगी मिळाली आहे. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील जाहीर सभेला पालिकेने परवानगी नाकारल्याचा आरोप काँग्रेसने आज केला. त्यामुळे येत्या 1 मार्चला राहुल गांधी यांची एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या मैदानाची पाहणी केली. त्यानंतर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, एखाद्या राजकीय पक्षाला शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी दिली असेल तर तशी परवानगी काँग्रेसलाही मिळायला हवी होती. मात्र काँग्रेसला जाणीवपूर्वक परवानगी नाकारल्याच्या आरोपाचा पालिका प्रशासनाने इन्कार केला आहे. सभेच्या परवानगीसाठी किमान 45 दिवस आधी अर्ज करावा लागतो. काँग्रेसकडून वेळेत अर्ज आला नसल्यामुळे परवानगी नाकारली, परंतु त्यांना सरकारकडे परवानगी मागता येऊ शकेल असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.