मालिकेदरम्यान वजन वाढल्यास अभिनेत्रींनी देणार डच्चू

सामना ऑनलाईन । मुंबई

मालिका सुरू असताना लग्न किंवा अफेयर करू नये, गरोदर राहू नये अशा काही अटी अभिनेत्रींवर लादल्या जातात, तसा करारच त्यांच्यासोबत केला जातो पण आता या अभिनेत्रींना मालिकेदरम्यान वजन वाढू न देण्याची देखील तंबी देण्यात आली आहे. स्टार भारत या वाहिनीवरील क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेतील पाचही अभिनेत्रींच्या करारात मालिकेदरम्यान वजन वाढू न देण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामधून या अभिनेत्रींना व्यायामासाठी वेळ काढावा लागणार आहे.

मालिकेआधी अभिनेत्री स्वत:ला फीट ठेवण्यासाठी व्यायाम करत असतात पण मालिका सुरू झाल्यावर चित्रीकरणाच्या १२-१२ तासांच्या शेड्युलमुळे अभिनेत्रींनी व्यायामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचशा मालिकांमध्ये सुरूवातीला एकदम फीट दिसणाऱ्या या अभिनेत्री कालांतराने गुबगुबीत दिसायला लागतात. त्यामुळे बऱ्याचदा अभिनेत्रींवर व मालिकेवर टीकाही होते. त्यामुळेच कदाचित या मालिकेच्या निर्मात्यानी ही अट घातल्याचे बोलले जात आहे.

क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेत ओजस्वी ओबेरॉय, आस्था अग्रवाल, रीना अग्रवाल, धरती भट्ट, एम. राधिका या पाच अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या पाचही अभिनेत्रींच्या करारात वजन वाढू न देण्याची अट आहे. याबाबत विचारले असता या अभिनेत्रींनी निर्मात्यांची बाजू घेत ही अट त्यांच्या हितातीच असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अभिनेत्रीनी वजन वाढू न देण्याची अट असल्याचे मान्य केले असले तरी या मालिकेचे निर्माते विपुल डी शाह यांनी मात्र असा करार केला नसल्याचे सांगितले आहे.