गणरायाच्या आगमनावर पाऊस रुसल्याचे सावट

10

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

शेकडो वर्षांपासून ‘नाचत ये देवा खेळत ये’ अशी आर्जव करत गणरायाच्या आगमनासाठी आतूर होण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र यंदा लाडक्या गणरायाच्या आगमनावर पाऊस रुसल्याचे सावट जाणवत असून, गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली तरी जिल्हा परिषदेच्या मैदानावर भक्तांची फारशी गर्दी नसल्याने दूरवरून आलेले विक्रेते चिंतेत पडले आहेत.

संभाजीनगर शहरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पेण, रायगड, मुंबई, पुणे आणि नगर या ठिकाणाहून मूर्तींची आवक होत असते. मात्र यावेळी गणेशोत्सव सुरू होण्यास अवघा एक दिवस उरला असताना अनेक गाळे रिकामेच असल्याचे दिसून आले. तर अनेक गाळ्यांचा भाव यावर्षी १८ रुपये प्रतिचौरस फुटांप्रमाणे असल्याने दोन दोन हजार चौरस फुटांच्या गाळ्याचे भाडे भरणार तरी कसे, असा प्रश्न विक्रेत्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अनेक गाळ्यांमध्ये मंडप डेकोरेटर्सनेच होलसेल भावात माल आणून मांडल्याचे दिसून आले.

गिरीश आर्टची चौथी पिढी
शहरात संभाजीपेठेतील भाजीमंडईत चार पिढ्यांपासून मूर्ती बनवणारे मोनू परदेशी यांच्या गिरीश आर्ट या दुकानात गेल्या चार पिढ्यांपासून अनेक प्रकारच्या आकर्षक मूर्ती बनवल्या जातात. यावर्षीसुद्धा विविध प्रकारच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे मोनू याने सांगितले. या दुकानात जि. प. मैदानापेक्षाही रेखीव आणि सुबक मूर्ती असून, गेल्या वर्षभरात घरातील चार जणांनी परिश्रमपूर्वक केवळ २५०० मूर्ती बनवल्या आहेत. घरीच साचे बनवून, वेलवेट कापड, फ्लोरोसेंटचे रंग, मणी, कुंदन, माळा, लेस यापासून एक मूर्ती बनवण्यासाठी तीन ते चार दिवस लागत असल्याचे ते म्हणाला. या ठिकाणी ५ इंचापासून ४ फुटांपर्यंत गणेशमूर्ती असून, भाव २५१ रुपयांपासून ११ हजार रुपयांपर्यंत आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे केवळ अर्धाच माल बनवला असून, तोसुद्धा विकला जातो की नाही, अशी चिंताही त्याने व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या