सर्जा राजाच्या उत्सवावर दुष्काळाची गडद छाया

सामना प्रतिनिधी । औसा

श्रावण महिना म्हटल्यास चोहिकडे हिरवीगार बहरलेली शेती अन् झुळणुळ वाहणारे नदी-नाले व तुडूंब भरलेले तलाव. शेतकरी सर्जा-राजाचा उत्सव बैलपोळ्या निमित्त खांदेमळणी दिवशी बैलांना स्वच्छ धुवून नदीत किंवा तलावात आंघोळ घालून हालगीच्या निनादात बैलांना सजविण्यासाठी तयार करतात. परंतु औसा तालुक्यावर यावर्षी निसर्गाने वक्रदृष्टी दाखविली आणि दुष्काळाच्या गडद छायेतच शेतात वर्षभर राबणार्‍या सर्जा-राजाचा उत्सव करण्याची केविलवाणी धडपड शेतकरी करीत आहेत.

यावर्षी केवळ ३९० मिमी पाऊस पडला असल्याने खरीप पिकांची उगवण झाली परंतु पावसाअभावी पिकांची वाढ व म्हणावी तशी फळधारणा झाली नसल्यामुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आला. काळ्या आईची मनोभावे सेवा करीत राबणारा बळीराजा मात्र आज अडचणीत असताना सुध्दा आपल्या सोबत मातीत नांगरणीपासून ते कोळपणीपर्यंत राबणार्‍या सर्जा-राजाला सजवून अंगावर शोभेची नक्षीदार झुल टाकून मोरकी, मटाट्या, शिंगाला बाशिंग, रिबीन, शेंब्या बसवून पुरण पोळीचा नैवद्य सर्जा-राजाला खायला देतो. बैलांची व गाईची ढोल-ताशांच्या व हालगीच्या गजरात मिरवणूक काढतो. नैवद्य दाखवून बैलांचे लग्नही लावतो. अशा या पारंपारिक बैल पोळ्याचा शेतकर्‍यांना मोठा खर्च असतो.

निसर्गाची अवकृपा, पिकविम्यात झालेल्या तालुक्यावरचा अन्याय, वाढती महागाई, कर्ज माफीची फसवी घोषणा, हमीभावाचा उडालेला बोजवारा आणि आडत बाजार बंद असल्याने शेतीमाल विकण्याची झालेली अडचण, सणांची दाटी आणि कुटुंबाचा वाढता खर्च या सर्व संकटाशी सामना करीत औसा तालुक्यातील शेतकरी आज बैलपोळ्याचा सण साजरा करीत आहेत. श्रावण महीना संपला तरी श्रावण सरींचा अनुभव मात्र पहायलाही मिळाला नाही. कडक उन्हात आता शेतकरी राजाला फक्त परतीच्या पावसाची आशा लागली असून शेतकरी राजाचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

औसा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाची गडद छाया तालुक्यावर असली तरी सर्जा-राजाचा उत्सव मात्र कसाबसा करण्याची धडपड शेतकरी राजा करीत आहे, पण यावर्षी पावसाने पाट फिरवली असल्याने दुष्काळाची गडद छाया आहे.