खेळ आणि दहशतवाद हातात हात घालून कसे चालतील?

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तान जोपर्यंत सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी खेळच काय, कसलेही संबंध ठेवणे शक्य नाही. कारण खेळ आणि दहशतवाद हातात हात घालून कसे चालतील, असे खडे बोल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.
पाकिस्तानी कुस्तीपटू व स्क्वाशपटूंना व्हिसा नाकारण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयाचे समर्थन करताना क्रीडामंत्री गोयल यांनी पाकिस्तानी सरकारला चांगलेच फटकारले. राष्ट्रीय युवा सन्मान पुरस्कार निवड प्रक्रिया पद्म पुरस्काराच्या धर्तीवर ऑनलाइन करण्याची घोषणा यावेळी गोयल यांनी केली.

पाकिस्तानच्या कुरापती सर्व जगाला ज्ञात
पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याची माहिती सर्व जगाला आहे. तिथल्या सरकारने दहशतवादाशी नाते तोडावे यासाठी दबाव यावा म्हणूनच आम्ही पाकिस्तानी कुस्तीपट्टू व स्क्वाशपटूंना ‘व्हिसा’ नाकारला आहे. पाकिस्तानने आपले वर्तन सुधारावे अन्यथा त्यांच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याची आमची भूमिका कायम राहील, असेही क्रीडामंत्री गोयल यांनी बजावले.