अल्पसंख्याक कॉलेजांत मराठीची घुसमट, शिक्षकांचे पगारच रोखले

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

सोमय्या कॉलेजने मराठीच्या शिक्षिकेला नोकरीवरून कमी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील अल्पसंख्याकसह अन्य अनुदानित ज्युनियर कॉलेजमध्येही मायबोली मराठीची घुसमट सुरू असल्याचे समोर आले आहे. अकरावी, बारावीच्या वर्गांना मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे पगार रोखण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी अर्धवेळ शिक्षकांना घड्याळी तासांवर काम करण्यास भाग पाडण्यात येत आहे. अन्य एका कॉलेजमध्ये मराठीच्या रिक्त झालेल्या पदांवर दोन वर्षांपासून नव्याने नेमणूकच करण्यात आलेली नाही.

मराठी विषय शिक्षिका मीरा कुलकर्णी यांच्यावर सोमय्या कॉलेजमध्ये झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची दादर येथे बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांनी मराठी विषयाच्या सुरू असलेल्या मुस्कटदाबीला वाचा फोडली. पश्चिम उपनगरातील एका नामांकित कॉलेजमध्ये मराठी विषय शिक्षकांची तीन पदे होती. त्यातील एका पदावरील शिक्षक २०१५ मध्ये निवृत्त झाले, पण आजतागायत या पदावर नव्याने नेमणूक करण्यात आलेली नाही, अशी माहिती महासंघाचे सचिव प्रा. अनिल देशमुख यांनी दिली. हे पद भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून या कॉलेजला एनओसी मिळाली नाही. याचा फायदा घेत कॉलेजने मराठीचे विद्यार्थी अन्य विषयांकडे वळविले, असा आरोपही देशमुख यांनी केला.

मराठी सोडून पीटी आणि पर्यावरण विषय शिकवावे लागतात
आमच्या कॉलेजच्या संचमान्यतेची शहानिशा न करता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मराठी विषयाचा सरप्लस शिक्षक कॉलेजमध्ये पाठवला. १९९९ पासून मी मराठी आणि शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक म्हणून याठिकाणी काम करीत आहे. पण ऑक्टोबर २०१६ मध्ये सरप्लस शिक्षकामुळे माझा मराठीचा कार्यभार कमी करण्यात आला तेव्हापासून मराठीचा शिक्षक असूनही मी पर्यावरण व शारीरिक शिक्षण हे विषय शिकवीत आहे. कॉलेजने पाठविलेली संचमान्यता न तपासता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मराठीचाच सरप्लस शिक्षक पाठविल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे माझ्या वेतनश्रेणीवरही परिणाम होत आहे. – प्रा.शंकर मगर, शिवाजी टेक्निकल हायस्कूल, कुर्ला

  • परदेशी भाषा, आयटी विषयांचाही मराठीला फटका
  • फ्रेंच, जर्मन यांसारख्या परदेशी भाषा, आयटीच्या विषयांचा मराठीला चांगलाच फटका बसत आहे. हे विषय कॉलेजमध्ये विनाअनुदानित तत्त्वावर शिकविले जातात.
  • बाहेर या विषयांना चांगली मागणी असल्याचे भासवून काही कॉलेज मराठीऐवजी हे विषय घेण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडतात. मराठी हा अनुदानित विषय असल्याने तो मोफत शिकविला जातो. मात्र विद्यार्थ्यांनी अन्य विषय घेतला तर त्याचा कॉलेजला नक्कीच आर्थिक फायदा होतो.
  • अन्य विषय विनाअनुदानित असल्याने कंत्राटी तत्त्वावर शिक्षक नेमले जातात. हे शिक्षक जास्तीत जास्त पाच ते सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करतात. शिक्षकांना जास्तीत जास्त पाच ते सहा हजार पगार दिला जातो. मात्र या विषयांची फी सुमारे २५ हजारपर्यंत घेतली जाते.
  • इंग्रजी माध्यमाच्या कॉलेजमध्ये मराठी हा द्वितीय भाषा विषय असून त्याला हिंदी, गुजराती, उर्दूसह परदेशी भाषा तसेच इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर हे आयटीचे विषय पर्याय म्हणून दिले आहेत. या विनाअनुदानित विषयांचा कॉलेजला आर्थिक फायदा होतो.

ऑक्टोबर २०१५ पासून पगार नाही!
२०१४ मधील ऑनलाइन संचमान्यतेतील त्रुटींचा फटका मला बसला. मागील १७ वर्षांपासून मी अर्धवेळ मराठी शिक्षक म्हणून काम करीत आहे. पण या संचमान्यतेमुळे मी घड्याळी तासावरील शिक्षक म्हणून गणला जाऊ लागलो. सप्टेंबर २०१५ पर्यंत मला घड्याळी तासाप्रमाणे पगार मिळाला. पण आता तोही मिळत नाही. अनेकदा केलेल्या पाठपुराव्यानंतर मे २०१७ मधील संचमान्यतेत मला पुन्हा अर्धवेळ शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली, पण शालार्थ वेतनप्रणालीत माझी नोंद नसल्याने पगारच मिळत नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण निरीक्षक नेहमी टाळाटाळच करतात. – प्रा. विनोद बेल्हेकर, जी.एस.पी.एम. ज्युनियर कॉलेज