पन्हाळेदुर्ग पर्यटनस्थळी पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर

1

सामना प्रतिनिधी, दापोली

तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेदुर्ग लेणी परिसरात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मात्र त्याचवेळी येथे चोरटे, दारुडे यांचा वावर वाढला आहे. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही सोयीसुविधा नसल्याने येथील पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस दूरक्षेत्र उभारा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पन्हाळेदुर्गमधील या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. अतिशय दुर्गम भागात तसेच वशिष्ठाrच्या खाडी भागात ही लेणी असून या ठिकाणी पर्यटकांना कसल्याही सुविधा मिळत नाहीत. महिला पर्यटकांसाठी कसल्याही सुविधा नाहीत. येथे परिसरातील तरुण मद्यपानासाठी या जागेचा वापर करतात. तर प्रेमीयुगुले येथे प्रेमलीला करत असतात. येथील पर्यटकांना कोणताही धाक नाही. याबाबत ग्रामपंचायतीने रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन पोलीस दूरक्षेत्र उभारण्याची मागणी केली आहे.

‘पन्हाळेदुर्ग येथे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही सुविधा नाही. याबाबत आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे या परिसरात किमान पोलीस दूरक्षेत्र तरी उभारावे अशी मागणी केली आहे.’
-राजेंद्र उतेकर, सचिव, पन्हाळेदुर्ग प्राचीन लेणी विकास समिती