डोकलामबाबत कोणताही समझोता नाही

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । बीजिंग

सिक्कीममधील डोकलामबाबत चीन कोणताही समझोता करणार नाही. हिंदुस्थानने सैन्य मागे घेतल्यानंतरच चर्चा सुरू होऊ शकते, असे वृत्त चीनचे सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या ‘शिन्हुआ’ने दिले आहे. त्यावरून चीन त्यांच्या आडमुठ्य़ा भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न होत आहेत, मात्र चीन त्यांची आडमुठी भूमिका सोडण्यास तयार नसल्याने समस्या बिकट होत आहे.

डोकलाममधून सैन्य मागे घेण्याची चीनच्या मागणीकडे हिंदुस्थान दुर्लक्ष करत आहे. याची मोठी किंमत हिंदुस्थानला चुकवावी लागू शकते असा इशाराही ‘शिन्हुआ’ने दिला आहे. डोकलामची समस्या सोडविण्यासाठी हिंदुस्थान राजनैतिक पर्यायांचा विचार करत आहे. शांततेच्या मार्गने समस्या सोडविण्यावर हिंदुस्थानचा भर आहे. हिंदुस्थानच्या या भूमिकेलाच ‘शिन्हुआ’ने प्रत्युत्तर दिले आहेत. बॉर्डर लाइन हीच बॉटम लाइन आहे म्हणजेच याबाबत कोणताही समझोता होणार नाही अशी आडमुठी भूमिका चीनकडून घेण्यात आली आहे. ‘शिन्हुआ’ने याआधीही अशीच भूमिका घेतली आहे. या समस्येत चीन माघार घेणार नाही. याबाबत भूतान किंवा हिंदुस्थानचे काहीही ऐकले जाणार नाही. हा भाग चीनचा आहे आणि या भागात रस्ता बनवण्यावर चीन ठाम आहे असे सांगण्यात आले. हिंदुस्थान भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांना मोठी मानहानी पत्करावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानला धोका
डोकलाममध्ये चीन रस्ता बांधत आहे. हा भाग ईशान्येकडील राज्यांना देशाशी जोडतो. या भागात चीनने रस्ता बांधल्यास देशाच्या संपर्क यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भागावर भूतनचा दावा आहे. चीन, सिक्कीम आणि भूतानच्या सीमा या भागात एकत्र येतात. चीन आणि भूतानच्या वादात हिंदुस्थान भूतानाची बाजू घेत आहे. चीनने रस्ता बनवल्यास त्यांची घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांचा भाग त्यांच्या तोफांच्या क्षमतेत येणार आहे. १९७५ मध्ये सिक्कीम हिंदुस्थानात विलीन झाला आहे. त्यामुळे चीनने माघार घ्यावी अशी हिंदुस्थानची भूमिका आहे. डोकलाम तणावानंतर चीनने नथुला पासकडून मानसरोवर यात्रेचा मार्ग बंद केला. त्यानंतर हिंदुस्थानने मार्ग बदलला आहे.

हिंदुस्थानने सैन्य मागे घेतल्यानंतरच चर्चा; चीनची आडमुठी भूमिका
लडाखशी संबंध जोडू नये
लडाखमध्ये २०१३ आणि २०१४ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांनी चर्चेने हा प्रश्न सोडवला होता. मात्र लडाखची परिस्थिती वेगळी होती. दक्षिण कश्मीरमधील लडाखवरून पाकिस्तान, हिंदुस्थान आणि चीनमध्ये वाद होते. त्यामुळे चर्चेद्वारे ती समस्या सोडविण्यात आली, मात्र डोकलाममधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. डोकलाम हा चीनचाच भाग असून याबाबत कोणताही समझोता होणार नाही.