बर्मुडा, स्लीपर परिधान करून रूमबाहेर येऊ नका, कार्यक्रमांत शेरवानी, कुरताच हवा !

aligarh-muslim-university

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे पारंपारिक पावित्र्य बिघडेल असे वर्तन करू नका. होस्टेलच्या रूमबाहेर येताना बर्मुडा, शॉर्ट्स आणि स्लीपर्स परिधान करू नका. विद्यापीठाच्या कार्यक्रमांना हजर राहताना काळी शेरवानी अथवा कुर्ता-पायजमा अशा वेषातच या, असा कडक फतवा अलिगड मुस्लिम विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी जारी केला आहे.

अलिगड मुस्लिम विद्यापीठ ( एएमयू ) कॅम्पसचे पावित्र्य नव्याने येणारे विद्यार्थी आपल्या बेशिस्त वर्तनाने बिघडवत आहेत.त्यामुळे विद्यापीठाला कॅम्पसमध्ये कोणत्या वेशात वावरावे याचे निर्देश जारी करावे लागल्याचे एएमयू प्रशासनाने स्पष्ट केले. हॉस्टेलबाहेर जातानाही योग्य वेष परिधान करूनच बाहेर पडा. कुर्ता आणि पायजम्यावर स्लीपर घालून फिरू नका.भोजन कक्ष ,वाचनालय आणि कॉमनरूमसाठीही हेच नियम लागू असतील असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ परिसरात वर्तनही असे हवे
-भोजन कक्षप्रमुखाला मिया अथवा भाई म्हणावे
-सिनियर आणि जुनिअर कॅन्टीनमध्ये बसून खात असतील तर सिनिअर्सनी ते बिल भरावे.
-एखाद्याच्या रूममध्ये प्रवेश करताना दरवाजा खटखटवून परवानगी घेऊन तेथे प्रवेश करावा
-घरून आणलेले खाद्यपदार्थ वाटून खाण्याची सवय लावावी
-विद्यापीठाच्या पुरातन सर शाह सुलेमान सभागृहाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.

एएमयु प्रशासनाने दिलेले निर्देश पाळून जुनिअर्स विद्यार्थ्यांनी आपले सिनिअर्स आणि शिक्षक वर्गासमोर उत्तम आदर्श ठेवावा. जेणेकरून विद्यापीठाच्या पवित्र परंपरांचा मान राखला जाईल.
-सदाफ झैदी,एएमयू हॉस्टेल प्रमुख