चंद्रपूर यात्रेसाठी विशेष गाड्या नसल्याने भाविकांची गैरसोय

2

सामना प्रतिनिधी । नांदेड

चंद्रपूर यात्रेसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येतात. त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी विशेष गाड्या सोडण्यात येतात. मात्र, यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आणि यात्रा एकाच दिवशी आल्यामुळे चंद्रपूर यात्रेसाठी विशेष गाड्या उपलब्ध नसल्याने यात्रेकरूंची गैरसोय झाली. त्यांना बस स्थानकातच मुक्काम करावा लागला.

जिल्ह्यातून हजारो भाविक चंद्रपूर येथील देवीच्या यात्रेसाठी येतात. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान असल्याने महामंडळाकडून विशेष गाड्या सोडण्यात आल्या नाहीत. तसेच यात्रेकरूंच्या प्रवासासाठी महामंडळाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने भाविकांची गैरसोय झाली. विशेष गाड्या उपलब्ध नसल्याने अनेक भाविकांना बसस्थानकातच मुक्काम करावा लागला. अनेक यात्रेकरूंनी चंद्रपूरसाठी विशेष बसची व्यवस्था करण्याची विनंती आगारप्रमुखांना केली. मात्र, यात्रेसाठी गाड्या उपलब्ध नसल्याचे सांगत आगारप्रमुखांनी बससेवा पुरवण्यास असमर्थता दर्शवली. मतदानासाठी बसेस देण्यात आल्या आहेत. यामुळे आगारात अधिकच्या बसेस उपलब्ध नाहीत. यामुळे यात्रेसाठी विशेष बसेस चालविता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. चंद्रपूर यात्रेसाठी बसव्यतिरिक्त इतर व्यवस्था नसल्याने यात्रेकरूंनी बसस्थानकातच मुक्काम केला.

दरवर्षी चंद्रपूर यात्रेसाठी ज्यादा बसेस सोडण्यात येतात. त्यामुळे महामंडळाला चांगले उत्पन्न मिळाते. तसेच चालक आणि वाहकांनाही ज्यादा काम केल्याचा भत्ताही मिळतो. त्यामुळे यात्रेसाठी चालक वाहकही या विशेष गाड्या चालवण्यासाठी तयार असतात. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत महामंडळाने विशेष गाड्यांचे नियोजन केले नसल्याने यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केली.