नागा दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक नाही, लष्कराची माहिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमार सीमेवर जबरदस्त ऑपरेशन केले. सीमा पार न करता नागा दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पहाटे 4.45 वाजता नागालँड येथून लष्कराच्या पूर्व विभागाने ही कारवाई केली आहे.

आज पहाटे 3 वाजता नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड खापलाग (एनएससीएन-के) या दहशतवादी गटाने नागालँड येथील सीमेवरील लाग्खू गावात हिंदुस्थानी लष्कराच्या तुकडीवर हल्ला केला. सीमेपासून 10-15 कि.मी.वर आत हा हल्ला झाला. हिंदुस्थानी जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. पहाटे 4.45 च्या सुमारास हिंदुस्थानी जवानांनी सीमा पार न करता म्यानमारच्या हद्दीत असलेल्या नागा दहशतवाद्यांच्या अड्डय़ांना टार्गेट केले. जवानांच्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

हिंदुस्थानी जवानांना इजा झालेली नाही -लष्कर

एनएससीएन-केचा स्वयंघोषित प्रवक्ता इसाक सुमी याने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकून या कारवाईत हिंदुस्थानचे तीन जवान मारले गेल्याचे म्हटले आहे. लष्कराच्या पूर्व विभागाने याचा इन्कार केला असून, एकाही हिंदुस्थानी जवानाला इजा झालेली नाही असे स्पष्ट केले आहे.

हे सर्जिकल स्ट्राईक नाही

हिंदुस्थानी लष्कराने केलेली कारवाई हे स्ट्राईक आहे. सर्जिकल स्ट्राईकनाही असेही लष्कराने म्हटले आहे. एनएससीएन-के या नागा दहशतवादी संघटनेवर बंदी आहे. एस.एस. खापलाग हा या संघटनेचा म्होरक्या असून तो म्यानमारमध्ये आहे. बहुतांशी अड्डे नागालँड सीमेनजीक म्यानमार हद्दीत आहेत. दोन वर्षांपूर्वी जून 2015 ला हिंदुस्थानी लष्कराने असाच हल्ला केला होता. त्यात 20 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.