सूर्याचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदरला न देण्याचा निर्धार, १८ ला ‘पालघर बंद’चा नारा

सामना ऑनलाईन, वाणगाव

पालघर जिल्हय़ातील सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई- विरार, मीरा- भाईंदरला वितरित होणार असल्याने पालघर जिल्ह्यातील बहुजन, शेतकरी, आदिवासी व बागायतदार यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशा प्रकारची स्थिती पालघर जिल्ह्यातील रहिवाशांची झाली आहे. त्यामुळे सूर्याचे एक थेंबही पाणी मीरा-भाईंदर, वसईला देणार नाही असा निर्धार करतानाच सरकारविरोधात १८ सप्टेंबर रोजी ‘पालघर बंद’चा नारा पालघरवासीयांनी दिला आहे.

सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने याबाबत कासा केंद्र, विठ्ठलनगर येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन केले होते. या सभेला पालघरचे खासदार चिंतामण वनगा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, पालघरचे नगराध्यक्ष तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, वन हक्क समितीचे अध्यक्ष प्रकाश हाडळ, सचिव राजू दिवा, सुरेश दांडेकर, श्रमजीवीचे नरेश कामडी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याची जीवनदायिनी ठरलेल्या सूर्या प्रकल्पाचा पाणीसाठा २७६.३५ दशघमी इतका आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून निधी वापरला आहे . सुमारे ४५७ कोटी निधी या प्रकल्पासाठी वापरला असून त्याद्वारे १४ हजार ६८६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे प्रस्तावित आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर मुंबई महानगर विकास प्राधिकरण यासाठी १८२.१० दशघमी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे ७ हजार ६८१ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहणार आहे.

आजच्या सभेत याबाबत जनजागृती करण्यात आली असून सूर्या प्रकल्पाचे पाणी हे वसई-विरार, मीरा-भाईंदर या महानगरपालिकांना न देण्याचा निर्धार व सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आला . तसेच याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.