धरणे काठोकाठ… नो टेन्शन

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यभरातील धरणांबरोबर मुंबईची धरणेही काठोकाठ भरली असून अतिरिक्त पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून त्यामध्ये सध्या 128.93 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मोडक सागर तलाव क्षेत्रात दिवसभरात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. तानसा धरणात 144.59 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरणाची क्षमता 145.08 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. 942.10 दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असलेल्या भातसात धरणात 929.77 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.

ठाणे, कल्याणमधील धरणक्षेत्रात दमदार हजेरी

ठाणे, कल्याण धरणक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले. या धरणाची क्षमता 233.07 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. वसई, विरार, मीरा रोड आणि भाईंदरचीही पाण्याची चिंता मिटली आहे. या महापालिकांमधील धामणी धरणदेखील 100 टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता 276.35 दशलक्ष घनमीटर आहे.

उर्वरित महाराष्ट्रही पाणीदार

कोयना, भंडारदरा, उजनी, जायकवाडी धरणक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. कोयना धरणात सध्या 104.17 टीएमसी पाणीसाठा असून धरण भरण्यास एक टीएमसी पाणी कमी आहे. मुसळधार पावसामुळ कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या संभाजीनगरमधील जायकवाडी धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. जायकवाडी सध्या क्षमतेच्या 92 टक्के भरले आहे. सोलापूरमधील उजनी धरण पूर्णपणे भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.