फटाक्यांचे आवाज काढणाऱ्या बुलेट जप्त करा, ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी

सामना प्रतिनिधी । मालवण

कर्णकर्कश आवाज करून बुलेट दुचाकी चालविण्यावर पोलिसांची नजर असणार आहे. बुलेटचे सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा आवाज करून वर्दळीच्या ठिकाणी युवकांकडून भरधाव वेगाने ‘रुबाबात’ बुलेट चालविले जाते. त्यामुळे अशा बुलेटस्वारांवर बुलेट जप्त करण्याची कारवाई करावी, असे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी दिली.

मालवण येथे शांतता समितीच्या बैठकीत व्यापारी व नागरिकांनी बुलेटस्वारांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती. यावेळी सचिन पांडकर यांनी तात्काळ दखल घेत नियमाचा भंग करून बुलेट चालविणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करून बुलेट जप्त करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या. त्यामुळे बुलेटवर कारवाई होऊन पादचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

मालवणात शंभरहुन अधिक बुलेट आहेत. मात्र काहींनी बुलेट दुचाकीचे सायलेंसर बदलून फटाक्यांचे आवाज काढला जातो. तरुण वर्गात हा जणू नवा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. मात्र, मोठ्या अचानक येणाऱ्या बुलेटच्या आवाजाने अनेक वाहनचालक, पादचारी आणि विशेषतः वयस्कर मंडळी व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अचानक कानांवर बुलेटमधून फटाक्यांचा आवाज आदळल्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची भीतीही नाकारता येत नाही. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

महाविद्यालयीन युवक किंवा तरुण वर्गामध्ये बुलेट भरधाव वेगात चालवून सायलेन्सर मधून विशिष्ट कर्णकर्कश आवाज काढला जातो. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलिसांना कारवाई करून बुलेट जप्तीचे आदेश दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नियमांचा भंग करून बुलेट चालविणाऱ्या युवकांवर कारवाईचा बडगा उगारल्यास निश्चितच बुलेटस्वारांना चाप बसू शकणार आहे.