महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्काराची नामांकने जाहीर

सामना ऑनलाईन । मुंबई

झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या पुरस्कार सोहळ्यातील नामांकन घोषित करण्यात आली आहेत. झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव प्रेक्षक निवडीचे पुरस्कार आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार आठव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १४ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे. मराठी चित्रपट चाहते आजपासून या पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले ३१ डिसेंबरपर्यंत मत नोंदवू शकतात.

‘फेव्हरेट चित्रपट’ या विभागात वेगवेगळ्या शैलीचे तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी फास्टर फेणे, व्हेंटिलेटर, ती सध्या काय करते, बॉईज, ची व ची सौ का आणि मुरंबा या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. २०१७ मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलारांचा फेव्हरेट अभिनेता आणि फेव्हरेट अभिनेत्री या विभागात समावेश करण्यात आला आहे. फास्टर फेणे आणि मुरंबा या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी अमेय वाघ याने फेव्हरेट अभिनेता या विभागात २ नामांकनं पटकावली आहेत. त्याचबरोबर व्हेंटिलेटर चित्रपटातील अभिनयासाठी जितेंद्र जोशी, ती सध्या काय करतेसाठी अंकुश चौधरी, चि व चिसौका मधील सोलारपुत्राच्या भूमिकेसाठी ललित प्रभाकर आणि बॉईज चित्रपटासाठी पार्थ भालेराव यांनी विभागात नामांकनं पटकावली आहेत.

फेव्हरेट अभिनेत्री या विभागात सई ताम्हणकर हिने जाऊंद्याना बाळासाहेब मधील सादर केलेली गावरान मुलगी नामांकनं पटकावून गेली आहे. तसेच मुक्ता बर्वे हिची हृदयांतरमधील भूमिका, सोनाली कुलकर्णी हिचा कच्चा लिंबूमधील अभिनय, पर्ण पेठे हिची फास्टर फेणेमधील भूमिका, चि व चिसौकामधील मृण्मयीने सादर केलेली व्हेज कन्या आणि मुरंबामधील गोड मिथिला पालकर यांनी देखील या विभागात नामांकनं पटकावली आहे. फेव्हरेट गीत या विभागात जाऊंद्याना बाळासाहेब मधील ‘ब्रिन्ग इट ऑन’ आणि ‘डॉल्बी वाल्या’, ‘बॉईज’ चित्रपटातील लग्नाळू, ती सध्या काय करते या चित्रपटातील ‘हृदयात वाजे समथिंग’ तसेच व्हेंटिलेटर मधील ‘या रे या’ आणि ‘बाबा’ या गाण्यांचा समावेश आहे.

तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, आकाश ठोसर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, अभिनय बेर्डे आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन पटकावलं आहे. तसेच सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर, मिथिला पालकर, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन पटकावले आहे.