पावसाचा ट्रॅप, सांगली-लातूरात अवकाळी

सामना प्रतिनिधी । मुंबई

एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे पावसाने मात्र जणू ‘ट्रप’च लावला आहे. आज अचानक सांगली-लातूरला पावसाने चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हा पाऊस वातावरणातील हवेच्या विशिष्ट स्थितीमुळे होतो म्हणून त्याला ‘ट्रप’चा पाऊस असे म्हणतात. राज्याच्या काही भागांत पुढील काही दिवस पावसाचा हा ‘ट्रप’ असाच राहणार असल्याचे सांगितले जाते.
सांगली जिल्हय़ातील कवठेमहांकाळ तालुक्यात शनिवारी दुपारी गारपीट झाली. पावसाने घाटनांद्रे, तिसंगी, रांजणी, जाकापूर या परिसरातला चांगलेच झोडपून काढले. हिंगणगाव, बोरगाव, करलहट्टी या परिसरातही हलक्या सरी कोसळल्या. सांगलीत ही स्थिती होती तर नजीकच्या मिरज, विटा, वाळवा या तालुक्यांमध्ये मात्र ४० डिग्री तापमान होते. पावसाच्या या ‘ट्रप’मुळे द्राक्ष बागायतदारांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.

मुंबईत उकाडा कायम
कोकण, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे वातावरण असले तरी हवामान कोरडेच आहे. मुंबईत अद्याप तरी पावसाची शक्यता नाही.
– डॉ. के. एस. होसाळीकर,
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, कुलाबा वेधशाळा

काय असतो ‘ट्रप’
एखाद्या भागात हवेची ‘द्रोणीय स्थिती’ निर्माण होते. या स्थितीत हवेच्या वरच्या स्तरात पावसाचे ढग निर्माण होऊन त्या भागापुरताच पाऊस पडतो किंवा ढगांचा गडगडाट होतो.