नुरी कंदील आणि e रिक्शा

शैलेश माळोदे,[email protected]

डॉ. अनिल राजवंशी… पुण्याजवळील फलटणसारख्या छोटय़ाशा गावात ऊर्जेवर महत्त्वपूर्ण संशोधन करून तेथील सामान्यांचे जगणे सुलभ केले आहे…
पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवाला आरामात आणि सुखानं जगावंसं वाटतं. मुनष्याच्या बाबतीत ही दोन गोष्टींची बेरीज असते. या दोन गोष्टी म्हणजे वैयक्तिक सुख आणि चांगलं पर्यावरण. हे चांगलं पर्यावरण निर्माण करण्यालाच मी राष्ट्रनिर्मिती म्हणतो. फलटणसारख्या प्रामुख्याने उजाड माळरान प्रामुख्याने असलेल्या ग्रामीण भागात राहत उच्चशिक्षित अभियंते असलेल्या डॉ. अनिल राजवंशी यांनी प्रत्यक्ष आपल्या राहणी आणि कार्यातून संशोधनातून हे सर्व करणं शक्य असल्याचं मॉडेल सर्वांपुढे ठेवलेलं आहे. ‘निंबकर ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट’ (नारी) संस्थेचे संचालक असलेले डॉ. राजवंशी मूळ उत्तर प्रदेशातले. 1972 साली बी.टेक मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर मूळचेच हुशार असल्यामुळे त्यांनी पुढे फ्लोरिडा विद्यापीठातून ‘सोलर एनर्जी’ विषयात संशोधन करून ‘सोलर डिसॅलिनेशन ऑफ सी वॉटर’ या विषयात पीएच.डी. मिळवली.

त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच विद्यापीठात अध्यापनही केलं. ग्रीनकार्ड मिळून पुढे लवकरच नागरिकत्वही जलदरीत्या मिळण्याची संधी असूनही त्यांनी हिंदुस्थानात परतण्याचा निर्णय घेतला. ते म्हणतात, ‘‘मी सर्व काही सोडून म्हणजे मिळालेलं ग्रीनकार्ड, तिथली विद्यापीठातली नोकरी वगैरेवर लाथ मारून ग्रामीण विकासात काम करण्याच्या ध्यासानं परतलो. माझा अहंकार आणि ‘जुनून’ बरोबरच मी काहीतरी वेगळा असल्याच्या भावनेने मला देश बदलायचा होता. ही एका तरुणाची जिद्द घेऊन मी परतलो. अर्थात देशातली स्थिती काही बदलली नाही. मात्र या सर्व प्रवासात मी मात्र बदलत गेलो. अधिकाधिक स्वतःला समजत, उमगत आध्यात्मिक होत गेलो, धार्मिक नव्हे.’’

“हिंदुस्थानात परतल्यावर विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरून ग्रामीण भागातील प्रश्न, विशेषतः शेती आणि ऊर्जेविषयीच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष फिल्डमध्ये जाऊन, राहून करायचा विचार पक्का केला’’ राजवंशी यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून ते फलटणसारख्या गावात काम करू लागले. त्यांच्याबरोबर संवाद साधताना हा माणूस किती साधासरळ, पारदर्शक असल्याचं सतत जाणवत राहिले. पण अधिक प्रकर्षाने जाणवला तो त्यांच्या ठायी असलेली विनोदबुद्धी आणि कुशाग्रता यांचा अद्भुत संगम वडिलांनी बेवकूफ म्हटलेला हा मुलगा आज मन की शांती मिळवत तरुणांचे मेंटॉरिंग करीत आजही कार्यरत आहे. ते स्वतः रोल मॉडेल बनून.

डॉ. राजवंशींना सुरुवातीला फलटणला काम करणं जड गेलं. वीज जवळपास नव्हतीच. ‘बदल घरातूनच’ या उक्तीनुसार राजवंशी यांनी 1984 साली स्थानिक बाजारपेठेत मिळणारं साहित्य वापरून स्वतःसाठी पर्यवरणपूरक घर उभारलं. 16 इंच जाडीची भिंत असणारं घर उन्हाळय़ात गार आणि हिवाळय़ात ऊबदार वातावरण ठेवतं. म्हणून वातानुकूलित यंत्रांची गरज नाही असं ते अभिमानानं सांगतात. घरासभोवती अनेक एकर पसरलेली हिरवळ त्यांच्या संशोधनास उपयुक्त आहे. ऊर्जा क्षेत्रात, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांची ऊर्जा गरज भागविण्याचे पर्याय शोधणं, प्रत्यक्ष अनुभवातून तंत्रज्ञान पर्याय विकसित करण्यासाठीचं संशोधन आणि प्रसार, प्रचार करण्यावर भर दिला. त्यांनी एक खास प्रकारचा कंदील ‘नुरी’ विकसित केला. त्याद्वारे 100 वॅटचा बल्ब सहज प्रकाशतो. शिवाय काजळी न धरता प्रकाश मिळून स्वयंपाकदेखील करण्यास उपयुक्त ठरतो. पेट्रोमॅक्स दिव्यापेक्षा 40 टक्के कमी इंधन वापरतो. राजवंशी म्हणतात “कमीत कमी इंधनाद्वारे प्रकाश’’ उपलब्ध करून देणं ही मुख्य कल्पना असून त्यासाठी चार-पाच वर्षांचे परिश्रम आणि विज्ञान-तंत्रज्ञान आवश्यक आहे. त्यांनी गाव पातळीवर काम करणाऱया छोटय़ा मायक्रो युटिलिटीची कल्पना मांडली आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेलं शेण आणि जैवभार (बायोमास) वापरून बायोरिऍक्टरद्वारे छोटय़ा सिलिंडरमधून हा गॅस उपलब्ध करून देता येतो.

नवप्रवर्तन हा ग्रामीण भागातीलच नव्हे तर एकूणच सर्वांचं जीवन सुधारण्याचा राजमार्ग असून त्यासाठी इंटरनेट, मोबाईल यांसारख्या साधनांचा वापर आवश्यक आहे. म्हणून त्यांनी कंदील – कम – स्टोव्ह बनवला. तो हिंदुस्थानातील ग्रामीण जनतेसाठी असूनही कॅलिफोर्नियात हिट झाला. त्यांनी बनवलेली ई-रिक्षा पुणे विद्यापीठातील परिसरामध्ये वापरली जात असे. ही ई-रिक्षाच्या आधुनिकतेसाठी एक उत्तम गोष्ट ठरली. त्यातून फिरण्याचा आनंद फलटणला घेण्याचं भाग्य लेखकाला लाभलं. या ई-रिक्षासाठी परदेशातूनही चांगली मागणी आहे. ऊर्जा, परिवहन याबरोबरच अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती. या क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी या क्षेत्रात नावीन्याची, नव्या दृष्टिकोनाची, ताज्या दमाच्या हुशार तरुणांची गरज आहे. कारण अन्न गरज भागविणं आवश्यकच. त्यासाठी कृषी अभियांत्रिकीन मौलिक बदल घडविण्यासाठी मूलगामी संशोधन हवे असं सांगणाऱया डॉ. राजवंशी यांनी हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी गोडय़ा ज्वारीचा वापर करून विविध प्रकारचे पदार्थ आणि बायोडिझेल निर्माण केलंय. ‘प्रेसिशन फार्मिंग’ हे भविष्य असल्याचं ते आग्रही प्रतिपादन करतात. ‘ऍग्रिकल्चरल रेसिडय़ूज’ हे टाकाऊ पदार्थ नसून ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त कच्चा माल असल्याचं डॉ. राजवंशी यांच्या संशोधनातून सिद्ध झालंय. कमी पाण्यात वर्षागणिक दोन पिकं घेता येणाऱया ज्वारीच्या प्रजातीही त्यांच्या संस्थेनं विकसित केल्यात.

डॉ. राजवंशी यांना तरुणांशी संवाद साधणं आवडत असल्यामुळे ते तशी एकही संधी सोडत नाहीत. ‘मेंटॉरिंग’ करणं हेच या वयात आवश्यक आहे असं सांगत 68 वर्षांचा हा तत्त्वज्ञ अभियंता विविध संस्था, विद्यापीठांत फिरून भाषणं तर देतोच, पण नियमितपणे लेखनही करतो. पण त्यांना खरा आनंद मिळतो चिंतन, संशोधन आणि युवकांशी गप्पा मारण्यात. आजही त्यामुळे ते मनाने चिरतरुण आणि कार्यप्रवण असलेले डॉ. राजवंशी आपलं काम पुढे नेऊ इच्छिणाऱयांच्या शोधात आहेत.