ईशान्य हीच पवित्र दिशा का?

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)

आपल्या वास्तू शास्त्राप्रमाणे मुख्य दिशा चार. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. प्रत्येक दिशेला उपदिशा आहेत. उपदिशा चार आहेत. ईशान्य,आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. आपल्या सर्व शास्त्रात पूर्व दिशा फार महत्वाची मानली गेली आहे. ह्याचे कारण म्हणजे ह्या दिशेतून उगवणाऱ्या सूर्याकडून सृष्टीला नवी ऊर्जा, तेज बहाल करत असतो. ही ऊर्जा आपल्याला मिळावी ह्यासाठी सूर्याला सकाळी अर्घ्य देण्याची पद्धत आहे. सूर्यासमोर काही मिनिटे उभे राहून त्याची ऊर्जा आणि तेज आपल्याला मिळावे हा उद्देश. वैज्ञानिक दृष्ट्या पहाटे सूर्याच्या किरणांत व्हिटॅमिन “डी ” असते. ह्या व्हिटॅमिनची आपल्या शरीराला दिवसभराच्या धावपळीत अत्यंत गरज असते. पूर्वीच्या काळी सूर्याला अर्ध्य देणे ह्या पद्धतीमुळे नैसर्गिकरित्या सर्वांना हे जीवनसत्व मिळत होते. कुठल्या डॉक्टरकडून व्हिटॅमिन “डी”ची इंजेक्टशने घेण्याची गरज भासली नाही. आज आपण विशेषतः “मुंबईकर” पहाटे उठतो आणि ऑफिसला जायची तयारी करतो पण पाच मिनिटे त्या रोज ऊर्जा देणाऱ्या सूर्यदेवासमोर उभे राहण्यासाठीही आपल्याकडे वेळ नाही. आणि मग काही वर्षांनी व्हिटॅमीन “डी”ची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. कॅल्शिअमच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काय बरोबर ना?

पूर्व दिशेप्रमाणेच उत्तर दिशेलाही तेवढेच महत्त्व. उत्तर दिशा म्हणजे लक्ष्मी आणि कुबेराची दिशा. साक्षात ह्या दिशेत लक्ष्मी आणि कुबेर वसलेले आहेत का? हे सिद्ध करणे कठीण. ह्याबाबत माझे स्वतःचे मत थोडे वेगळे आहे. सूर्याच्या भ्रमणाचा विचार केल्यास सूर्य पूर्व दिशेत उगवून पश्चिमेस मावळतो. परंतु हे भ्रमण पूर्व -दक्षिण -पश्चिम असे असते. सूर्याची सकाळची कोवळी उन्हे फार आल्हादायक असतात. दुपारी १२ नंतर मात्र ह्या उन्हाचा तडाखा जाणवायला लागतो. दुपारी १२ ते ४ ह्या वेळेत आपल्याला उन्हात चालणे,फिरणे शक्य नसते. उन्हाळयाच्या दिवसांत तर ते असह्य होते. म्हणूनच दुपारी १२ वाजता जेवण करून ही वेळ वामकुक्षी करण्याची म्हणजेच डाव्या कुशीवर २० मिनिटे झोपावे असे सांगितले गेले आहे. डाव्या कुशीवर झोपल्याने अन्न चांगल्याप्रकारे पचते. आज आपण जेवून तडक प्रवासाला लागतो किंवा एका जागी बसून कॉम्पुटरवर कामे करतो मग स्वास्थ्य टिकणार ते कसे? असो तर आपल्या विषयाकडे वळूया. सूर्याचे भ्रमण पूर्व -दक्षिण आणि पश्चिम ह्या दिशेतून असल्याने दक्षिण दिशा टाळावी असे आपले शास्त्र सांगते. दक्षिण दिशा वाईट मुळीच नाही. ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगते – प्रत्येक दिशेचे महत्त्व वेगळे आहे. परंतु सूर्याच्या ह्या भ्रमणमार्गात सूर्य जेंव्हा दुपारी ११ ते ४ ह्यावेळेत दक्षिण दिशेतून पश्चिमेला जातो तेंव्हा सूर्याची ह्या वेळेतील किरणे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतात. आणि म्हणून दक्षिण ही वर्ज्य दिशा आहे. दक्षिणेच्या समोर आहे उत्तर. ह्या दिशेतून सूर्याचे भ्रमण होत नसल्याने ही दिशा “थंड” प्रकृतीची आहे. इथे तो दक्षिणेसारखा उष्मा जाणवत नाही. ह्या दिशेत जी व्यक्ति जास्तीत जास्त वेळ व्यतीत करते तिचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहून आयुष्य वाढते. म्हणजेच “शारीरिक संपत्तीचा” संचय होतो. म्हणून कदाचित उत्तर दिशेला “संपत्तीची दिशा “म्हणून संबोधले जात असावे. लोकांनी ह्या दिशेत रहावे,दक्षिण वर्ज्य करावी ह्याकरिता ह्या दिशेत “लक्ष्मी आणि कुबेर” ह्या देवतांचा वास आहे हे सांगितले गेले असावे. (हे माझे वैयक्तिक मत आहे. )

उत्तर आणि पूर्व ह्या दिशांचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच आहे. मग विचार करा ह्या दोन दिशेत जर इतकी ऊर्जा आहे तर ह्या दोन दिशांमधील जी उपदिशा आहे -ईशान्य,त्या दिशेत किती ऊर्जा असेल? ह्या दिशेत तुम्ही सकाळचा वेळ जर व्यतीत केलात तर तुमच्यासारखी श्रीमंत व्यक्ति तुम्हीच. म्हणून ही दिशा एवढी पवित्र असावी. ह्या दिशेत “देवघर” असावे असे सांगितले गेले आहे. इथे देवघर म्हणजे ह्या दिशेचे पावित्र्य पाळले जाणार. देवासमोर बसतांना आपण एकाग्रचित्ताने बसतो. फोन,टी.व्ही. आणि इतर विचार बंद असतात. ह्या दिशेतील ब्रह्मांडलहिरी प्राप्त करण्यासाठी स्वतःची नकळत मानसिक तयारी करतो. ही ऊर्जा घेऊन आपण उत्साहाने दिवसभराच्या कामाला सुरुवात करतो.

ह्या दिशेत टॉयलेट्स म्हणजे सकाळी जो वेळ तुम्ही ह्या दिशेत शांत चित्ताने बसून ह्या दिशेतील ऊर्जा ग्रहण करा हा दिलेला संदेश मोडीत निघणार. टॉयलेट्स असल्यामुळे तुम्ही दिवसभरात ह्या दिशेत जास्तीतजास्त वावरणे टाळले जाते. ही दिशा टाळणे म्हणजे अनारोग्य. ह्याच कारणाकरता ह्या दिशेत “टॉयलेट्स” वर्ज्य सांगितले गेले आहेत.

माझ्याकडे येणाऱ्या जातकांपैकी ९८% जातकांच्या घरी मला ईशान्य दिशेत टॉयलेट्स आढळून आलेले आहेत. दक्षिण दिशेत असलेल्या मुख्यदारापेक्षाही ह्या दिशेत टॉयलेट्स असतील तर शारीरिक पीडा जास्त जाणवते. ह्या दिशेत शक्यतो टॉयलेट्स असू नयेत. जर असतील तर वास्तू -शास्त्राप्रमाणे काही उपाय सुचवले गेले आहेत त्याचा जरूर उपयोग करावा. ह्या उपायांमध्ये तोडफोड करणे, टॉयलेट्स ह्या दिशेतून दुसऱ्या दिशेत नेणे, भिंत तोंडणे, पिल्लर्स तोडणे हे उपाय अजिबात नाहीत. तोडफोडीशिवाय परिणामकारक उपाय वास्तू -शास्त्राप्रमाणे आहेत. हे उपाय करण्याआधी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकाल –

१) टॉयलेट्समध्ये एका वाडग्यात “खडे मीठ ” ठेवावे. हल्लीच्या पिढीला हे खडे मीठ म्हणजे काय हे माहीत नाही. खडे मीठ म्हणजे पूर्वीच्या काळी स्वयंपाकात हे मीठ वापरले जायचे. अजूनही काही स्वयंपाकात ह्याचा उपयोग होतो. आपल्या जवळच्या वाण्याकडे हे मीठ उपलब्ध असते. ते मीठ एका चिनीमातीच्या वाडग्यात घेऊन टॉयलेट्समध्ये खिडकीत ठेवून द्यावे.

२) निलगिरी, खडे मीठ, गोमूत्र आणि थोडे पाणी ह्याचे मिश्रण सकाळ -संध्याकाळ शिंपडावे.

३) टॉयलेट्चे दार नेहेमी बंद राहील अशी काळजी घ्यावी.

४) टॉयलेट्समध्ये ड्रेनेजची दुर्गंधी येणार नाही ना ह्या संदर्भात काळजी घ्यावी.

बाकी उपाय हे अनुभवी वास्तू-तज्ज्ञाकडूनच करून घ्यावेत आणि ह्या दिशेतील ऊर्जा सकारात्मक राहील अशी काळजी घ्यावी.

ईशान्य दिशेचे महत्त्व सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न !!!

प्रतिक्रिया जरूर कळवा. [email protected]