उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा म्हणाला, ‘आता पुरे झाले’

सामना ऑनलाईन । प्योंगयांग

दक्षिण कोरियासोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने मोठी घोषणा केली आहे. उत्तर कोरिया आता कोणत्याही प्रकारची अणवस्त्र चाचणी करणार नाही, असे किमने जाहीर केले आहे. किमची ही घोषणा म्हणजे जगासाठी गुड न्यूज आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

‘आम्ही यापूर्वी केलेल्या अण्वस्त्र परिक्षणानंतर निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले आहे. त्यामुळे आता यापुढे कोणतीही अण्वस्त्र चाचणी करणार नाही’, असे किमने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पुढील महिन्यात किम चर्चा करणार आहे. तसेच पुढील आठवड्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्याशीही किम चर्चा करणार आहेत. या दोन महत्त्वाच्या चर्चांपूर्वीच किमने ही घोषणा केल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे महत्त्व आहे.

उत्तर कोरियाची अण्वस्त्रसज्जता

उत्तर कोरियाने जागतिक दडपणाला भीक न घालता आजवर सहा अणवस्त्र चाचण्या केल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात उत्तरी हामग्योंग प्रांतामध्ये उत्तर कोरियाने सहावी अण्वस्त्र चाचणी केली होती. या अण्वस्त्र चाचणीनंतर आजूबाजूच्या परिसरात ६.३ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती. उत्तर कोरियाच्या इतिहासातील ते सर्वात मोठे अण्वस्त्र परिक्षण होते.

अमेरिकेकडून स्वागत, जपान अजूनही नाराज

किम जोंगच्या या अनपेक्षित घोषणेचे जगभरात जोरदार पडसाद उमटले. ‘उत्तर कोरिया आणि संपूर्ण जगासाठी ही चांगली बातमी असून ही एक मोठी प्रगती आहे.’ असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. किमसोबत होणाऱ्या चर्चेबाबतही आपण उत्साही असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेने उत्तर कोरियाच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी जपानची नाराजी अजूनही संपलेली नाही. किमने छोटी आणि मध्यम दर्जाची क्षेपणास्त्रांची चाचणी बंद करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सामूहिक विनाश करणारी शस्त्र उत्तर कोरिया नष्ट करत नाही तोवर आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे जपानने स्पष्ट केले आहे.