काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात, राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको

12

काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन

पुणे – आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढविण्यासाठी इच्छूक असणार्‍यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. निवडून येण्याची क्षमता आणि निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल असे सांगतानाच, पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नका, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आज इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे घेतल्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, अ‍ॅड. अभय छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे, काँग्रेसचे गटनेते, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.

बागवे म्हणाले, निवडून येण्याची क्षमता आणि निष्ठावंत यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. काँग्रेसमधून जे अन्य पक्षांत गेले, त्यामुळे पक्ष स्वच्छ झाला आहे.

१० जानेवारीनंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार
काँग्रेसची आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर कार्ड कमिटी निर्णय घेईल. त्यानंतर ही यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येईल. येत्या १० जानेवारीपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांकडूनही काँग्रेसने अर्ज मागविले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

नोटाबंदीविरोधात जानेवारीत आंदोलन
नोटाबंदीच्या फसलेल्या अंमलबजावणीच्या निषेधार्थ येत्या पाच जानेवारीला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करणार आहे, असे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक चारमध्ये अवघे तीनच उमेदवार
काँग्रेसने आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीमध्ये प्रभाग क्रमांक चार खराडी-चंदननगरमध्ये चार जागा असताना, मुलाखतीसाठी अवघे तीनच उमेदवार होते. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते.

अलगुडे-बागवे यांच्यात शाब्दिक चकमक
उपमहापौर अलगुडे हे बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांना पक्षाने नोटीस बजावली होती. त्यावर आज अलगुडे हे काँग्रेसच्या मुलाखतींना आले. त्यामुळे अलगुडे असे का वागता, असे बागवे यांनी विचारले. त्यावेळी बागवे आणि अलगुडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या