‘वंदे मातरम्’ न म्हणाणारे देशद्रोही नाहीत, केंद्रीय मंत्र्यांचे बोल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात ‘वंदे मातरम्’ न म्हणणारे देशद्रोही नाहीत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केले आहे. वंदे मातरम् म्हणणे किंवा न म्हणणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे नकवी म्हणाले. मात्र राष्ट्रीय गीताला विरोध करणेही योग्य नसल्याचेही नकवी म्हणाले. एनआयए या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री नकवी म्हणाले की, वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणणे अथवा न म्हणणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. वंदे मातरम् म्हणणाऱ्यास आपण देशभक्त आणि न म्हणणाऱ्यास देशद्रोही म्हणू शकत नाही, असे नकवी म्हणाले. मात्र कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून ‘वंदे मातरम्’ला विरोध करत असेल तर ते योग्य नसल्याचेही नकवी म्हणाले.

याआधी अबू आझमी आणि वारीस पठाण यांनी ‘मानेवर सुरी ठेवली तरी ‘वंदे मातरम्’ बोलणार नाही’, असे फूत्कार काढले होते. यावरून विधानसभेत चांगलीच खडाजंगी झाली होती. या दोघांच्या ‘वंदे मातरम्’विरोधी वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत अनिल गोटे, एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘हिंदुस्थान में रहेना हो तो वंदे मातरम् कहेना होगा’ असे ठणकावतानाच ‘वंदे मातरम् म्हणायचे नसेल तर तुमच्या देशात चालते व्हा,’ असा इशाराही दिला होता.