दीड महिन्यापुरताच ‘मुळा’त पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

51

सामना प्रतिनिधी । नगर

गतवर्षी अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा दुष्काळाचा तीव्र सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाळला असून नगर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुळा धरणाचा पाणी साठाही खपाटीला गेला आहे. शहरासाठी दीड महिनाच पाणी पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा भीषण पाणी टंचाई जाणवत आहेत. जिल्ह्यात नागरिकांची तहान भागविण्यासाठी 778 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणात 21 टक्के (5618 दशलक्ष घनफुट) पाणी साठा शिल्लक आहे. दरम्यान मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी महापालिकेला कळविले आहे की, 31 जुलैनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.

मुळा धरणातील कमी झालेला पाणी साठा, संभाव्य पाऊस वेळेत व पुरेसा न झाल्यास निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती विचारात घेता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकेने शहरवासियांना केले आहे.

पाऊस लांबल्यास होणार अडचण
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन लांबल्यास तसेच संभाव्य पाऊस वेळेत व पुरेसा न झाल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगर शहरासाठी मुळा धरणातून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे पत्र मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नगर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिकेस कळविल्यानुसार दि. 31 जुलैनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास धरणात पाण्याची आवक कमी होऊन पाणी टंचाई उद्भवण्याची संभाव्य परिस्थिती विचारात घेता महानगरपालिकेकडून पर्यायाने शहरातील नागरिकांकडून पाण्याचा वापर काटकसरीने होणे अत्यंत गरजेचे आहे.

मुळा धरणातील कमी झालेला पाणी साठा, संभाव्य पाऊस वेळेत व पुरेसा न झाल्यास निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती विचारात घेता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या