दिल्ली विद्यापीठ निवडणूक ‘नोटा’ बनली तिसरी संघटना

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘द नन ऑफ द अबोव्ह’ म्हणजेच ‘नोटा’ हा पर्याय चांगलाच चमकला आहे. एखादी तिसरी विद्यार्थी संघटना असल्यासारखी मते ‘नोटा’ला पडली आहेत.

काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया संघटनेने (एनएसयूआय) निवडणुकीत काल बाजी मारली. अध्यक्षपदाच्या लढतीत एनएसयुआयच्या रॉकी तुसीर याला १६,२९९ मते मिळाली, तर रजत चेधरी याला दुसऱया क्रमांकाची १४७०९ मते मिळाली. त्याखालोखाल ‘नोटा’ पर्याय तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तब्बल ५१६२ जणांनी नोटा पर्याय निवडला.

चार वर्षांनी दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पराभवला सामोरे जावे लागले आहे. उपाध्यक्षपदाच्या लढतीत कुणाल सेहराक्रत विजयी झाला. त्याला १६४३१ मते मिळाली. द्वितीय क्रमांकावरील पार्थ राणा याला १६२५६ मते, तर तृतीय क्रमांकावर राहिलेल्या आदित्य बैबहाव याला ७७६५ मते मिळाली. या लढतीतही ७६८४ मते ‘नोटा’ ला पडली. सचिव पदाच्या लढतीत ‘नोटा’ हा पर्याय चौथ्या स्थानावर राहिला. ७८९१ जणांनी तो निवडला. सहसचिव पदाच्या लढतीतही ९०२८ जणांनी नोटा हे बटण दाबलेले आहे.