नोटाबंदी ही एक प्रकारची संघटीत लूट होती- मनमोहन सिंग

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

उद्या म्हणजेच ८ नोव्हेंबरला मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ हा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्था तसेच लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं मनमोहन सिंग यावेळी म्हणाले.

काँग्रेसने नोटाबंदीला वर्ष पूर्ण होत असताना याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत असूत ती सरकारची सर्वात मोठी घोडचूक असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं. आतापर्यंत जगातील कोणत्याच देशाने असा निर्णय घेतला नाही. रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असंही ते म्हणाले. सरकारनं अचानक घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका नागरिकांना बसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

नोटाबंदीचा निर्णय घेऊन एका अर्थाने सरकारने ‘टॅक्स टेररिझम’ लागू केला आहे. नोटाबंदीचा लघुउद्योजकांवर मोठा परिणाम झाला. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय लोकांवर अक्षरश: लादला. नोटाबंदीवर प्रश्न उपस्थित केल्यास देशविरोधी ठरवले जाते. तसेच नोटाबंदी ही एक प्रकारची संघटीत लूट होती, अशा शब्दात मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.