थकबाकीदारांसाठी मालमत्ता करात ५० टक्के सूट

सामना प्रतिनिधी । धुळे

थकीत मालमत्ता कराची एकरकमी वसुली व्हावी यासाठी धुळे महापालिका प्रशासनाने एकरकमी थकबाकी भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत एकरकमी थकबाकी भरल्यास दंडाच्या रकमेत ५० टक्के आणि त्यानंतर ९ मार्चपर्यंत थकबाकी भरल्यास २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर या वेळी कारवाई होईल, असा इशारा महापौर कल्पना महाले यांनी दिला.

आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील बहुसंख्य मालमत्ताधारक थकबाकीदार असल्याचे लक्षात आले आहे. थकबाकीदारांवर वेळोवेळी महापालिकेने दंडात्मक रक्कम आकारली आहे. त्यामुळे अनेकांकडील वसुल करावयाची रक्कम वाढली आहे. मालमत्ताधारकांना एकदम इतकी मोठी रक्कम भरता येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील मालत्ताधारकांकडे ३३ कोटी ९६ लाख १० हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यात १३ कोटी ९७ लाख ४२ हजार रुपयांची मागील वर्षाची थकबाकी आहे. आजवर महापालिकेने ८ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपयांची वसुली केली. आता दंडाच्या रकमेत सूट जाहीर केल्याने नागरिक एकरकमी मालमत्ता कराचा भरणा करतील, असा आशावाद महापालिका प्रशासनाला आहे.

सूट योजनेचा फायदा नाकारणाऱ्या आणि थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई केली जाणार आहे. विशेष पथकाकडून थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच आणली जाईल. प्रसंगी मालमत्ता जप्त होईल, असेही सांगण्यात आले. प्रसारमाध्यमांना माहिती देताना महापौरांसोबत आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, अभिजित कदम उपस्थित होते.